the murder of the contractor in Thane | ठाण्यातील ठेकेदाराच्या हत्याकांडाचा उलगडा
दोन मारेकऱ्यांना गुन्हे शाखेने धाडले तुरुंगात

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कामगार पुरवणाऱ्या गणेश कोकाटे या (33) या ठेकेदाराला गोळ्या घालून जीवे मारणाऱ्या दोन आरोपींना तुरंगात धाडण्यात आले आहे. सदर कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने मंगळवारी सकाळी केली.
ठाण्यात सुरू असलेल्या बांधकामाच्या साईटवर कामगार पुरवणाऱ्या ठेकेदार गणेश कोकाटे यांचा काही जणांसोबत वाद सुरू होता. याच वादातून 8 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळच्या सुमारास गणेश कोकाटे याच्यावर कशेळी गावातील कमानी जवळ दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. या गोळीबारात गणेश कोकाटे गंभीर जखमी झाला. रक्तबंबाळ अवस्थेत गणेश कोकाटे याला ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मातर उपचार सुर असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास नारपोली पोलिसांसह ठाणे गुन्हे शाखेचे पथक संयुक्तरित्या करू लागले. तपासादरम्यान, या आरोपी इंदिरानगर नाका येथे येणार असल्याचे गुन्हे शाखेच्या पोलिसांना समजले. त्या माहितीच्या आधारे मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास गुन्हे शाखेचे उपायुक्त शिवराज पाटील, एसीपी राजकुमार डोंगरे, वपोनि विकास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भूषण शिंदे, अविनाश महाजन, पोउनि शिवाजी कानडे यांनी तपासी पथकासह सापळा लावला. प्राप्त माहितीनुसार आरोपी धनराज रमाकांत तोडणकर (33, इंदिरानगर, ठाणे), संदीपकुमार सोमेलाल कानोजिया (27, सुलतानपूर, उत्तर प्रदेश) यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. सदर गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार धनराज रमाकांत तोडणकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर श्रीनगर पोलीस ठाण्यात हाणामारी, हत्येचा प्रयत्न असे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलिसांनी दिली.
सदर कारवाई ठाणे पोलीस दलाचे आयुक्त जयजित सिंग, सह पोलीस आयुक्त दत्ता कराळे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश महाजन, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कानडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील अहिरे, हवालदार जगदीश न्हावळदे, हवालदार विजय काटकर, हवालदार अजय फराटे, हवालदार संदीप शिंदे, हवालदार नागपुरे, हवालदार रोहिदास रावते२, हवालदार सुनील निकम, पोलीस नाईक रघुनाथ गार्डे, पोलीस नाईक तेजस ठाणेकर, पोलीस नाईक उत्तम शेळके, पोलीस अंमलदार अमोलन इंगळे, पोलीस अंमलदार (चालक) यश यादव, महिला पोलीस हवालदार मीनाक्षी मोहिते, सुनीता गिते यांनी केली.