Maharashtra Police Anniversary 2023 | महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त ७.९२ लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना दिला परत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोहमार्ग पोलिसांचा अनोखा उपक्रम

मुंबई : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र चोखपणे कर्तव्य बजावणा-या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) लोहमार्ग पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा उपक्रम राबवला. शनिवारी ७ जानेवारी रोजी १४ फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल परत केला.
रेल्वेच्या प्रवासात प्रवाशांची होणारी लूट रोखण्यासाठी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे पालन करण्यासाठी लोहमार्ग पोलीस विभागाची सर्वच पथके आपापल्या परीने कर्तव्य बजावत आहेत.
या मोहिमेचा एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोहमार्ग पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापनादिनाचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला. या प्रसंगी पोलीस ठाण्यात १४ फिर्यादींना बोलवण्यात आले. संबंधितांचा चोरीला गेलेले ३ लाखांचे सोन्याचे दागिने, ३ लाख ३२ हजारांचे नऊ मोबाईल, एक लाख ३० हजारांच्या दोन मोटारसायकल ३० हजारांचा एक लॅपटॉप वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या हस्ते नागरिकांना देण्यात आला. चोरीला गेलेला ऐवज पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी लोहमार्ग पोलिसांचे मनापासून आभार मानले.
यांचे मोलाचे योगदान…
सदर मुद्देमाल परतीच्या कार्यक्रमासाठी पोलिस निरीक्षक सचिन मोरे, पोउनि अर्जुन सांगळे, हवालदार मंगेश आयरे, असे उपस्थित होते. हा उल्लेखनीय कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी हवालदार मल्लिकार्जुन बिराजदार व महिला अंमलदार रेश्मा घोडे यांनी मेहनत घेतली आहे.