Brihanmumbai co. opp Housing Society | मुंबई पोलिसांच्या हक्काच्या घरांसाठी मुहूर्त मिळेणा?
१० वर्षांपासून बृहन्मुंबई पोलीस को. आॅप. हौ. सोसायटीचे सुमारे साडेसहा हजार पोलीस घरांच्या प्रतीक्षेत!

मुंबई : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस दलातील पोलीस रात्रीन्दिवस कर्तव्य बजावत आहेत. मुंबई पोलीस दलासाठी कर्तव्य बजावणा-या अनेकांना हक्काचे घर नसल्याने सन २०१२ साली बृहन्मुंबई पोलीस को. आॅप. हौ. सोसायटीची स्थापना झाली. या सोसायटीत सुमारे साडेसहा हजार पोलीस अधिकारी व अंमलदारांनी लाखो रुपये भरले. मात्र १० वर्ष झाली तरी अद्याप पोलिसांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झालेले नाही.
पोलिसांच्या पैशांनी विकत घेतली १२० एकर जमीन…
मुंबई पोलीस दलात राज्यातल्या विविध जिल्ह्यातील पोलीस बांधव व भगिणी कार्यरत आहेत. या पोलिसांचे मुंबई शहरात हक्काचे घर नाही. त्यांना हक्काचे घर मिळण्यासाठी सन २०१२ साली बृहन्मुंबई पोलीस को. आॅप. हौ. सोसायटीची स्थापना करण्यात आली. या सोसायटीत मुंबई पोलीस दलातील सुमारे साडेसहा हजार पोलीस अधिकारी, अंमलदारांनी पहिल्या टप्प्यात एक लाख २१ हजार रुपये भरले. या पैशांतून रायगड जिल्ह्यातील वायाळ गाव (पनवेल) येथे १२० एकर जमिन विकत घेण्यात आली. दरम्यानच्या काळात एक फेब्रुवारी २0२0 रोजी सोसायटीकडून परिपत्रक क्र. १ जारी करण्यात आले. त्यानुसार या सभासदांनी १ लाख ८० हजार ५०० रुपये जमा केले. अशा प्रकारे सर्व सभासदांनी एकूण ३ लाख १ हजार ६०० रुपये व त्याहून अधिक रक्कम सोसायटीत भरली. मात्र अद्यापही घरांच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले नाही.
रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) एनओसी मिळत नसल्याने काम रखडले
पोलिसांच्या घरांसाठी आयपीएस अधिकारी श्री प्रताप दिघावकर व अन्य अधिका-यांनी बृहन्मुंबई पोलीस को. आॅप. हौ. सोसायटीची स्थापन केली. दिघावकर यांनी वेळोवेळी सर्व अटींची पूर्तता केली. इमारत उभारण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. मात्र सध्या एमएसआरडीसी विभागाकडून एनओसी मिळत नसल्याने अद्याप बांधकामाच्या भूमिपूजनासाठी मुहूर्त मिळालेला नाही. दरम्यानच्या काळात कोरोना संकटामुळे अनेक अडचणी आल्याचे बोलले जात आहे.
पोलिसांच्या जीवाला घोर…
आपले हक्काचे घर असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशीच इच्छा मुंबई पोलीस दलातील साडेसहा हजार पोलीस कुटुंबियांची होती. त्यामुळे त्यांनी बृहन्मुंबई पोलीस को. आॅप. हौ. सोसायटीचे सभासद झाले. हक्काच्या घराच्या आशेवर असलेले अनेक सभासद सध्या सेवानिवृत्त झाले आहे. तसेच या सभासदांपैकी काहीचे निधन झाले. त्याचे स्वप्न अपुरेच राहिले. सध्या काही सेवानिवृत्त पोलीस भाडेतत्त्वावर राहत आहेत. आज नाहीतर उद्या हक्काचे घर मिळेल, या आशेवर पोलीस कुटुंबीय आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तोडगा काढल्याशिवाय पर्याय नाही…
मराठी असो वा विविध भाषिक… शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नागरिकांच्या न्यायहक्कासाठी शिवसेनाची स्थापना केली. प्रत्येक शिवसैनिकाला कायम लोकहित जपण्याची शिकवण दिली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलांवर पाऊल टाकत उद्धव ठाकरे यांनी लोकहित जपले. त्यामुळेच सध्या ते महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत. मुंबई पोलिसांच्या घरांची रखडलेली अवस्था पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: याकडे लक्ष दिल्याशिवाय पर्याय नाही, असे म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून आपण अनेक प्रलंबित प्रश्नांवर कोणाच्याही भावना न दुखावता तोडगा काढला आहे. असाच तोडगा बृहन्मुंबई पोलीस को. आॅप. हौ. सोसायटीच्या सदस्यांसाठी काढावा, अशी अपेक्षा हजारो मुंबई पोलिसांकडून व्यक्त होत आहे.
Thanks for Sharing this News 💕
all the best