Bogus Food Safety officers | ७८ दुकानदार, हॉटेलवाल्यांना लुटणा-या तोतया फूड सेफ्टी अधिकाºयांना बेड्या
मुंबईच्या कस्तुरबा मार्ग पोलिसांची कौतुकास्पद कारवाई

मुंबई – मेडिकल, हॉटेल, किरणा माल दुकानदारांना कारवाईचा धाक दाखवून हजारो रुपये उकळणाºया दोन भामट्यांना कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली. या भामट्यांनी फूड सेफ्टी अधिकारी असल्याचे सांगून अंधेरी ते दहिसर परिसरातील ७८ जणांना लुटल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अशाच प्रकारे या भामट्यांनी बोरिवली पूर्व परिसरातील दोन हॉटेलवाल्यांकडून ५ व ४ हजार रुपये उकळले होते. हा गुन्हा घडल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत पोलिसांनी दोन्हीही भामट्यांना तुरुंगात धाडले, अशी माहिती सोमवारी पोलिसांनी दिली.
बोरिवली पूर्व परिसरात सेंट्रल प्रभू हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये ४ डिसेंबर रोजी फूड सेफ्टी अधिकारी बनून आलेल्या धर्मेश शिंदे, अविनाश गायकवाड ऊर्फ वर्धान साळुंखे यांनी धाड टाकली. या दोघांनी किचनमध्ये पाहणी केली असता कूकने डोक्यावर टोपी (जेवण बनवताना वापरणारी टोपी) घातली नव्हती. तसेच अन्य कारणे सांगून हजारो रुपयांचा दंड ठोठवणार, असे सांगितले. कारवाई टाळण्यासाठी हॉटेलवाल्याकडून ५ हजार रुपये घेऊ न दोघेही निघून गेले. अशाच प्रकारे त्यांनी आरोही हॉटेलवाल्याकडूनही ४ हजार रुपये घेतले. या प्रकरणी सेंट्रल प्रभू हॉटेलच्या मॅनेजरने कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी (गु. र. क्र. १४९२/२०२२) भादंवि कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, १७०, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तात्काळ तपास करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी दिल्या. त्यानुसार कस्तुरबा मार्ग पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून पोलिसांनी दोघांनाही तुरुंगात धाडले.

बोगस कार्ड जप्त
या कारवाईत पोलिसांनी बोगस ओळखपत्र, गुन्ह्यात वापरलेली कार, २ नोट बूक, औषध व अन्न प्रशासन विभागाशी सलग्न असलेली कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. या नोट बूकमध्ये ७८ हॉटेल, किरणा माल दुकाने, मेडिकल व अन्य दुकानांच्या नोंदी आढळल्या आहेत. या आरोपींनी अशाच प्रकारे आणखी लुटालूट केल्याचा संशय असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
यांनी केली कारवाई…
या गुन्ह्यांचा पर्दाफाश उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त वीरेंद्र मिश्र, परिमंडळ १२ चे उपायुक्त स्मिता पाटील, दहीसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत पिंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड, पोलीस निरीक्षक जगदाळे, पोनि तडाखे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ओम तोटावर, पोलीस उपनिरीक्षक वाळुंजकर, बोराडे, अंमलदार सर्वेकर, विचारे, परिट, पाटील, ठिक, सायबर एक्सपर्ट कलिम शेख आदी पथकाने केला.