Beauty Queen in Mumbai Police Department | मुंबई पोलीस खात्यातील ब्युटी क्विन सानिया मुलाणी
Won 2 prizes in Maharashtra Shravani 2022 Quin state level competition | महाराष्ट्र श्रावणी २०२२ क्विन राज्यस्तरी स्पर्धेत पटकावले २ पारितोषिक

मुंबई : मुंबई पोलीस! या खात्याची जगभरात ख्याती पसरली आहे. गुंडांचा बिमोड असो वा कुठलीही स्पर्धा असो पोलिसांनी कायम कौतुकास्पद कामगिरी केली आहे. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. याला निमित्त ठरले ठाणे शहरात रंगलेल्या महाराष्ट्र श्रावणी २०२२ सौंदर्य क्विन स्पर्धा. या स्पर्धेत मुंबई पोलीस खात्यात कर्तव्याला असलेल्या सानिया सिराज मुलाणी यांनी दोन पारितोषिके पटकावली.
पोलीस खात्यातील
सौंदर्यवतीचे कौतुक

डॉ. अनुजा राव यांनी ए.आर. व्हेंचर या कंपनीच्या माध्यमातून ठाण्यात सौंदर्य स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत वरिष्ठांची परवानगी घेऊ न सानिया सहभागी झाल्या. या स्पर्धेत बेस्ट परफॉर्म व उत्कृष्ट व्यक्तिमत्वाचा मुकूट पटकावला. या स्पर्धेत राज्यभरातून अनेक जण सहभागी झाले होते. मात्र ही स्पर्धा सानिया यांची विशेष उल्लेखनीय ठरली आहे. त्यांचे पती सिराग मुलाणी हेदेखील पोलीस खात्यात कर्तव्याला आहेत. पोलीस खात्यातील मुलाणी दाम्पत्याने आजवर अनेक सुखदु:ख प्रसंगाचा सामना केला आहे. संसार व कर्तव्य याचे योग्यरित्या नियोजन करत दोन्ही मुलांचे शिक्षण देत आहेत. ही एकूणच जबाबदारी पार पाडत त्यांनी सौंदर्य स्पर्धेची तयारी केली होती. या सर्व बाबी लक्षात घेत खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन माने यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सानिया यांना सन्मानित करण्यात आले. तसेच पोलीस निरीक्षक काटकर, पोलीस निरीक्षक अंचलवार, सपोनि कणसे, पोउपनि गवळी,महिला अंमलदार पूजा कारंडे, अनिशा मोरे या सर्वांनी खार पोलीस ठाण्यात त्यांचा जग्गी सत्कार केला.

२००४ साली पोलीस
खात्यात भरती


सानिया या सन २००४ साली मुंबई पोलीस दलात भरती झाल्या आहेत. खातेंतर्गत ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांची नियुक्ती तत्कालीन एल विभाग २ वरळी येथे करण्यात आली. येथे २००५ ते २०१० सालापार्यंत त्यांनी कर्तव्य बजावले. त्यानंतर २०१० ते २०१५ सालापार्यंत त्यांनी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात त्यांची नियुक्ती करण्यात आली. पोलीस खात्यातील नियमानुसार येथील कार्यकाळ संपल्यावर त्यांना विशेष शाखा एक (परिमंडळ ४) येथे कर्तव्यासाठी पाठवण्यात आले. तेथे २०१५ ते २०२१ या कालावधीत त्या कार्यरत होत्सा. पुन्हा बदली झाल्यानंतर सध्या त्या मुंबईतील खार पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत आहेत. या एकूणच कर्तव्याची दखल घेत व पोलीस खात्याची प्रतिमा उंचावल्याबद्दल सानिया मुलाणी यांना पीटीआय टाईम्सचा मानाचा सलाम!
