राजस्थान सीमेवरील सैनिकाचा मृत्यू

उमरखेड तालुक्यातील रुपाळा गावावर शोककळा
उमरखेड : शहरापासून अवघ्या दोन कि.मी. अंतरावर असलेल्या रुपाळा (नागापूर ) येथील जवान भारतीय सेनेमध्ये राजस्थान सिमेवर कर्तव्यावर आहे. अचानक किडणीचा त्रास सुरु झाल्याने दिल्ली येथील सैनिक रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान 22 ऑगस्ट रोजी सैनिकाचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त होताच रुपाळा (नागापूर ) गावावर शोककळा पसरली आहे.
वसंत देवराव देशमाने (30) असे मृतक सैनिकाचे नाव आहे. सन २०११ साली भारतिय सैन्यदलात दाखल झालेल्या वसंत देवराव देशमाने हा ३३वर्षीय जवान राजस्थान मधील अलवर या ठिकाणी 42 आर्टीलरी डिवीजन कर्तव्य बजावत होता. त्यास किडनीचा आजार जडल्याने त्याची प्रकृती बिघडल्याने सैन्यदलाच्या वतीने दिल्ली येथील सैनिकी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. आज सकाळी २२ ऑगस्ट रोजी उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. या दुर्दैवी घटनेचे वृत्त कळताच सहा महिन्याची गरोदर असलेल्या पत्नी सुवर्णमालावर आभाळ कोसळले आहे. देशमाने परिवार शोक सागरात बुडाला आहे. तसेच रुपाळा गावावर शोककळा पसरली आहे . मृतक वसंत देशमाने यांच्या पश्चात पत्नी सुवर्णमाला ,आई सुमनबाई , वडील देवराव ,भाऊ काशीनाथ, बहिण मनिषा खंदारे असा आप्त परिवार आहे. त्याचा मृतदेह दिल्ली येथून विमानाने नागपूर येथे आणण्यात येत आहे. उद्या सोमवार २३ ऑगस्ट रोजी त्याचेवर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती तालुका प्रशासनाने दिली आहे.