संपादकीय व लेख

माणसं भडकली की देश भडकायला उशीर लागत नाही

माणसं भडकली की
देश भडकायला उशीर लागत नाही

– आनंद गायकवाड
————————————————————————–
सत्ताकारणाची वाट धार्मिक दंगलीतून जाते, आता ती वहिवाट झाली आहे. जंतरमंतर वरील परवाचा धर्मधिंगाना पाहिल्यावर हाच तो देश आहे का जो परकियांच्या अत्याचाराविरुद्ध लढला असा प्रश्न निर्माण होतो. देशाचा ७४ वा स्वातंत्र्यदिन पुढ्यात आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण एक वर्षाने साजरा करणार आहोत. तरीही आम्हाला एक होता येत नाही वा एक होऊ दिले जात नाही. कोणते रेशमाचे ( की रेशीमबागेतील) किडे जय श्रीरामच्या घोषात आमची एकतेची वीण उधडायला निघाले आहेत.
————————————————————————-

काल परवा दिल्लीच्या कॅन्ट भागात एका नऊ वर्षांच्या वाल्मिकी समाजाच्या बालिकेवर सामूहिक बलात्कार करून तिचे शव जाळून टाकण्याची घृणास्पद व चीड आणणारी घटना घडली. हाथरस मधील मनिषाच्या दाहसंस्काराचा ताप कमी होत नाही तोच ही घटना घडली. जोपर्यंत शेकडोंचा समूह पोलीस स्टेशनवर चाल करून गेला नाही तोपर्यंत ढिम्म बसलेल्या पोलीसांनी या बलात्कार व खून प्रकरणी गुन्हा दाखल केला नाही. जनता व समाज माध्यमातून दबाव निर्माण झाल्यामुळे अखेर या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली. यात प्रमुख आरोपी घाटावरचा पुजारी आहे. देवादिकांच्या नावाने धंदा करणाऱ्या अशा पुजाऱ्यांवर आणि दगडांच्या दैवतांवर विश्वास का ठेवतात ही पददलित माणसं जी हजारो वर्षांपासून देवादिकांची गुलामी करुनही आपल्या अंधारलेल्या जीवनात प्रकाशाची पखरण करू शकली नाही ? हा देव रक्षा करू शकत नसेल तर तो प्रत्यक्षदर्शी साक्षीदारही कसा बनू शकेल ? जर असे होत नसेल तर त्याला बाद का करू नये. लक्ष्मीकांत घुमे आपल्या कवितेत ठासून सांगतो..,

कुठल्याही देवळात
सामूहिक बलात्कार झालेल्या केस साठी
आय विटनेस म्हणून सर्वप्रथम
दगडाच्या मुर्तीलाच कोर्टात हजर करावे
पुजाऱ्याला दोषी ठरवावे.

देवळात देव जर जागृत असेल तर भोळ्याभाबड्या भक्तांना अभय मिळायला पाहिजे. भक्तांचे मन शांत व्हायला हवे पण असे होत नाही. कारण देवळांची निर्मितीच जनतेचे शोषण करण्यासाठी झाली आहे. पंडे, पुजारी व बडव्यांची ही धर्ममान्य कंपनी आहे. धर्म कधी नव्हे इतका जनतेच्या जीवावर उठला आहे. अलिकडे तो माणसांत विद्वेषाची दाहक रेघ आखतो आहे. सत्ताकारणाची वाट धार्मिक दंगलीतून जाते, आता ती वहिवाट झाली आहे. जंतरमंतर वरील परवाचा धर्मधिंगाना पाहिल्यावर हाच तो देश आहे का जो परकियांच्या अत्याचाराविरुद्ध लढला असा प्रश्न निर्माण होतो. देशाचा ७४ वा स्वातंत्र्यदिन पुढ्यात आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण एक वर्षाने साजरा करणार आहोत. तरीही आम्हाला एक होता येत नाही वा एक होऊ दिले जात नाही. कोणते रेशमाचे ( की रेशीमबागेतील) किडे जय श्रीरामच्या घोषात आमची एकतेची वीण उधडायला निघाले आहेत. मखमुर सईदी म्हणतो,

कितनी दिवारे उठी है इक घर के दरमियाॅ
घर कहीं गुम हो गया दिवारोंदर के दरमियाॅ

परंतु देश विस्कटला तरी धर्मांधांना त्याचे काही सोयरसुतक नाही. कानपूरच्या अफसारला घरातून ओढत आणून बेदम मारहाण केली व जय श्रीराम चे नारे द्यावे म्हणून त्याच्यावर दबाव टाकण्याचा अश्लाघ्य प्रयत्न बजरंग दलाच्या तालिबान्यांनी केला. नॅशनल दस्तकच्या अनमोल प्रीतम वर झुंडशाहीने असाच दबाव टाकला. पण तो बधला नाही, कारण तो जयभीमवाला होता. हे असे का घडत आहे. शम्बूक व वालीची हत्या धर्ममान्य असणाऱ्या रामराज्याची ही सुरुवात आहे असे निर्लज्जपणे भगवा गमछा खांद्यावर घेतलेले भारवाही भक्त खुलेआम बोलायला लागलेत. हे सतत घडणार आहे, लक्ष्मीकांत म्हणतो,

अर्धी रात्र उलटून गेल्यावर
जळत असतात सभा
कटाचे स्मशानबेट आखून
त्यांचे काढले जातात प्लस – मायनस
जाळणारे आणि मारणारे हात
ज्ञात – अज्ञाताचे विनम्र सेवक होतात
आणि त्यांच्या षडयंत्री सस्पेन्सीव्ह ब्रॅन्चेस
आता गावोगावी त्यांचे प्लॅटफॉर्म
तयार झाले आहेत.

या शाखा कालपर्यंत गुप्त होत्या आज मात्र त्या जाहीरपणे कट रचतात आणि अंमलात आणतात. या शाखांच्या विनम्र सेवकांना कशाचेच भय राहिले नाही कारण सत्ता त्यांच्या पाठीशी उभी आहे. पण या सत्तेला आव्हान देणारा एक नीडर वर्गही देशात आहे याकडे लक्ष्मीकांत अंगुलीनिर्देश करतो,

पार्लमेंट मध्ये बसणाऱ्या लोकांनी
आता सावधान असलं पाहिजे
त्यांच्या खुर्ची जवळचा ध्यानस्थ बुद्ध
केव्हाही खवळून उठू शकतो
याचे भान राखले पाहिजे.

लक्ष्मीकांतची कविता मर्यादा संपलेल्या सहनशीलतेचा एल्गार आहे. हा एल्गारही ज्वलज्जहाल आहे. लक्ष्मीकांत भाकरीच्या शोधात निघालेला एक अत्यंत संवेदनशील कवी. जे जे भाकरीच्या शोधात आहेत त्यांच्याशी सख्य जपणारा व आपल्या हक्काच्या प्रदेशासाठी बलदंड सत्ताधीशांना ललकारणारा कार्यकर्ता आहे. इतकेच नव्हे तर बापालाही उद्देशून लिहिलेल्या या ओळी त्याच्या अंतर्मनातील विस्फोटक तगमग खूप काही सांगून जाते.

मी माझ्या बापाची शपथ घेऊन सांगतो
या वस्तीतल्या कोणत्याही बापाने
लेकराच्या दोन सांजेची सोय केल्याशिवाय
उगाच निष्पाप लेकरांना जन्म देऊ नये

कवीच्या अस्थिर आयुष्याला थांबाच नव्हता. प्रत्येक चौक त्याला भाकरीसाठी खुणवायचा. भाकरीच्या शोधात एकाकीपणे कधी बस स्थानकाच्या बेंचवर तो रात्र काढायचा. मनातील सुप्त सरोज कधीतरी त्याला जागे करायची मात्र भाकर तिथेही त्याचा मेंदू कुरतडायची,

तू अचानक माझ्या बाहुपाशात समावलीस
तेव्हा तुला हसता आलं नाही
अन् मला तुझे गुलाबी ओठही
मागता आले नाही..
मला वाईट वाटलं
तु म्हणालीस..
नाराज आहेस माझ्यावर ?
क्षणार्धात फुललो, तुही हसलीस
आणि एकाएकी विलग होत म्हणाली
तुझ्याकडे एखाद्या भाकरीचं पिठ असेल काय रे…?

एका सांजेच्या पिठासाठी छप्परावरचे पत्रे विकल्या जातात, जवान पोरी बिल्डिंग मध्ये नाईटला जातात हे पाहून कवीचा उर फाटून जातो. मग एखाद्या महापुरुषासारखे भाकरीचे फोटो चौकाचौकात लावायची तो घोषणा करतो. आपल्याच कष्टकरी हातांनी या देशातील शिल्पाकृती घडवल्या नि आपलेच हात कलम केल्या गेले. तरीही आपण पेटून उठत नाही. यावर तो भडकतो. पोट भरलेल्या लीडरवर तो चिडतो. संसदेच्या भिंतीआड बसलेले नेते त्याला कावळ्यासारखे भासतात. पक्षी संसदेवरून उडत जातात आणि संसद माणसांवरून रोलर सारखी, या शब्दांत कवी आपला संताप व्यक्त करतो. आजही मोठ्या प्रमाणात दलित शोषितांच्या हत्या होत असताना संसदेत कुणाला कशा मस्कऱ्याचारोळी सुचत असतील ? भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा तात्त्विक संताप पाहून ज्या संसदेच्या भिंती कधीकाळी थरथर कापल्या असतीत त्याच भिंती बाबासाहेबांच्या नावावर संसदेत पोहचलेल्यांचे भंकस बोल ऐकून आपलेच डोके आपल्याच भिंतीवर आपटून घेत नसतील, कशावरून ? तेव्हाची लक्ष्मीकांतची चीड न्याय्यच आहे. कवी असा संतप्त होतो. तो स्वातंत्र्याचीही समीक्षा करतो. त्याच्या आईच्या पदरावर तीन रंगांचे ठिगळ लावून घरीच राष्ट्रध्वज फडकताना तो पाहतो. फुटपाथवर भिकाऱ्यांना डंडे मारणारे पोलीस / बिमार बापासाठी धंदा करणारी मुन्नी / चिंध्यात झाकलेली आई / कडेकपारीतल्या बहिणी / भुकेलेल्यांची जगप्रसिद्ध सर्कस / जातीय दंगली / धर्मग्रंथांच्या पानातील अस्पृश्यता हे सर्व या हळव्या कवीला अस्वस्थ करतात पण तो अश्रू गाळत बसत नाही तो देशाकडे डोळे फाडून बघतो आणि विचारतो,

आपल्या देशाचा नकाशा बघ सरोज
कसा दिमाखात मिरवतोय
त्यात रोज उपाशी झोपणाऱ्या
कंगालांचा प्रदेश कसा दिसत नाही ?

या व्यवस्थेने मोर्चेकऱ्यांच्या उद्ध्वस्त केलेल्या झोपड्या व गरीबांसाठी नसलेली मायभूमी त्याच्या क्रोधात भर घालते. मी या व्यवस्थेच्या पाठीवरून बुलडोझर सारखी फिरवीन माझी कविता , या शब्दांत तो व्यक्त होतो. लक्ष्मीकांत घुमे याची कविता गरीबांच्या, भुकेल्यांच्या, निराश्रितांच्या , पददलितांच्या पाठीवरून हात फिरवते तर मुजोर, बेईमान, भांडवलशाही व दलाल लोकप्रतिनिधींच्या छाताडावर बुलडोझर फिरवते. लक्ष्मीकांत हा यवतमाळ जिल्ह्यातील मोहदा या खेडेगावात जन्मलेला बहुजन समाजातील कवी. रोजीरोटी साठी वणी या शहरात त्याने बस्तान ठोकले. अधिक शिकला नसल्याने काबाडकष्ट करून गुजरान करु लागला. कटिंग सलून टाकले पण मन रमेना. वाचनाची प्रचंड आवड असल्याने कविता लेखनाकडे तो वळला आणि घरच्या गरिबीमुळे त्याच्या कवितेत अंगार फुलला. भाकरीच्या शोधात हा त्याचा पहिला दीर्घ काव्यसंग्रह महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केला. या काव्यसंग्रहाला शासनाचा यशवंतराव चव्हाण वाङमय पुरस्कार मिळाला. संचारबंदी हा लक्ष्मीकांतचा दुसरा काव्यसंग्रह. १९६० नंतरच्या दलित साहित्याच्या झंझावाताने समकालीन लेखक कवी कलावंत यावर प्रभाव टाकला त्यातून लक्ष्मीकांतही सुटला नाही. दलित शोषितांच्या व्यथा आणि वेदनेची अभिव्यक्ती लक्ष्मीकांतच्या कवितेत पदोपदी जाणवते. लक्ष्मीकांतच्या शब्दांचा वस्तरा शोषकांच्या तत्वज्ञानाची शेंडी छाटण्यासाठी सरसावला. भांडवली लोकशाहीने सामान्य माणसांची जी दुर्दशा केली त्याची चीड कवितेतून व्यक्त व्हायला लागली. ही चीड त्याला मार्क्स कडे घेऊन गेली. त्याला भगतसिंगांचे प्रचंड आकर्षण. फासावर लटकलेल्या भगतसिंगात त्याला स्वतःचा व्याकूळ प्राण अटकलेला दिसतो. मार्क्स गिरवताना पोथीनिष्ठ मार्क्सवादी त्याच्या पचनी पडले नाही. मार्क्स व आंबेडकर असा समन्वय साधताना कवीने तोल बिघडू दिला नाही. तो म्हणतो,

भगतसिंगा
तुझे बलिदान पसरावे दारादारात
डॉ. आंबेडकरा
तुझ्या विचाराने जातीयवाद
तुडवून निघावा मळ्यामळ्यात

जातीयवाद व भांडवलशाही यावर लक्ष्मीकांतची कविता घणाघात करते. एकीकडे तात्त्विक सौंदर्य लेवून या कवीच्या कविता प्रभावीपणे आपल्या समोर येतात तर दुसरीकडे हीच कविता अत्यंत उग्र रूप धारण करून वाचकाला अस्वस्थ करते. हा प्रतिभाशाली कवी सद्या आपल्यात नाही पण सर्वसामान्यांना उठाव करण्यास बाध्य करणारी त्यांची कविता भूक, बेरोजगारी, स्त्रीवरील अत्याचार, बेगडी स्वातंत्र्याचा समाचार घेत शांतीप्रिय बुद्धानुयायांना आवाहन करते,

डॉ. आंबेडकरांचा फडकता ध्वज
हातात घेऊन
एक संतप्त मोर्चा सर्वप्रथम
बुद्धाकडेच घेऊन जावा
बुद्धाच्या शांततेचा भंग करावा
आणि यापुढे आम्ही शांत राहणार नाही
असे निवेदन सादर करावे.

कवी असे अफलातून आवाहन का करीत असावा ?
कवीला, बुद्ध नेहमी शांत असतात असे वाटते म्हणून की आंबेडकरी राजनेते ढिसाळ आहे म्हणून. कवी आवाहने, लिंबोणीतील अत्याचाराचा उल्लेख करतो, तो उत्तर भारतातील दलित हत्याकांडाचा हवाला देतो. असं सगळं होऊनही आंबेडकरी माणूस शांत कसा असे त्याला वाटत असावे. स्वातंत्र्य हे कोणत्या गाढवीचे नाव हे काल नामदेव ढसाळ बोलले नि आज , स्वातंत्र्य म्हणजे नुकत्याच अॅबाॅर्शन करून आलेल्या कुवाऱ्या पोरीने, पोटच्या अर्भकाचा घेतलेला बळी, असं घुमे बोलतो. हे स्वातंत्र्यच बजरंगींच्या हातात शस्त्र देत असेल तर आम्ही गप्प राहून चालणार नाही. पक्षी सुद्धा एका झाडाला बांधील राहात नाही, ते बंड करतात पण आपण माणसं असूनही आपली मुक्ती कोणत्या धर्मशाळेत आपण बंदिस्त ठेवली आहे असा प्रश्न कवीला पडतो. स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही माणसं जातीच्या पोत्यात कणसं भरल्या सारखी राहत असतील आणि जातयुद्धाची जमीन तयार करीत असतील तर लढलेच पाहिजे, कसेही करून…..! लक्ष्मीकांत म्हणतो…

मी पेटवतोय सुरूंग

मी पेटवतोय सुरूंग
तुम्ही मला बारुद आणून द्या.
माझ्या वस्तीत निष्पाप लेकराचे बळी जातात
जवान पोरीला रस्त्यात घेराव होतात
मी त्यांना
डायनामाईट पेरण्याचे शिक्षण देणार आहे.

पूर्वी चिंध्या विकून
चार पैसे कमविणारी बाई
किंवा मिल सुटल्यानंतर
चिंध्यात झाकलेली आई
आणि कडेकपारीतल्या वावरातून
येणाऱ्या माझ्या बहिणी
मी कोणाकोणाच्या शोकांतिकेचे निवेदन
इथल्या व्यवस्थेच्या गळ्यात अडकवू ?

उद्ध्वस्ततेच्या टोकावर येऊन
ठेपलेलं आयुष्य घेऊन
कोणत्या दिशेनं जाऊन करू
पार्लमेंटचा पाठलाग
इथली माणसं सुखी समाधानी नाहीत
म्हणून
माणसांनी पाहू नये माणसांचा अंत
माणसं भडकली की
देश भडकायला उशीर लागत नाही.

——————————————————————–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!