एचयूआयडीविरुद्ध सराफा आक्रमक ; सोमवारी सोन्याचे दुकान बंद

यवतमाळ – केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग युनिक आयडेंटिफिकेशन (एचयूआयडी) क्रमांक अनिवार्य केला आहे. या निर्णयाला विरोध म्हणून देशभरातील सराफा व्यापार्यांनी 23 ऑगस्ट रोजी एक दिवसीय बंद पुकारला आहे. हॉलमार्क असलेल्या दागिन्यांची विक्री अनिवार्य केली आहे. त्याचसोबत दागिन्यांना विशेष ओळख प्राप्त करुन देणारा एचयूआयटी हा क्रमांक देण्याचे बंधन लागू झाले आहे. यासाठी सरकारद्वारे निर्धारित करण्यात आलेल्या प्रयोगशाळांमध्ये दागिना देण्यात येतो. प्रयोगशाळेत दागिन्याचे हॉलमार्किंग होते. त्याला एचयूआयडी क्रमांक दिला जातो. ही संपूर्ण प्रक्रिया होण्यास आठ दिवसांचा कालावधी लागत आहे. क्रमांक देण्यासाठी असलेल्या प्रयोगशाळांची संख्या कमी आहे. ज्यामुळे ग्राहक तसेच सराफा व्यापारी त्रस्त आहेत. या विलंबामुळे ग्राहकांची खरेदी प्रभावित होत आहे. या सर्व पार्श्वभूमिवर एचयूआयडी रद्द करण्याबाबत सरकारने विचार करायला हवा अशी मागणी यवतमाळ जिल्हा सराफा असोसिएशनचे अध्यक्ष सारंग भालेराव, सचिव किशोर पालतेवार, रत्नाकर पजगाडे, सुरेंद्र लोणावत, शहर अध्यक्ष शैलेश लष्करी आदिंनी केली आहे.