विजय संकल्प

वज्रमूठ आवळुनी आता
तेजस्वी भगवा हाती धरू,
एक दिलाने, एक मनाने
चला विजयाचा संकल्प करू ।।
जे झाले ते विसरूनी जाऊ
चला थोडे मन मोठे करू,
संघटनेच्या भवितव्यासाठी
विचार अपुले एक करू,
एक दिलानेच साध्य होईल
विचार मनी आता एक धरु,
एक दिलाने, एक मनाने
चला विजयाचा संकल्प करू ।।
कोत्या मनाने अशक्य होईल
थिजेल अपुला अजिंक्य वारू,
मोठ्या मनानेच चालुनी आता
प्रतिपक्षाला आपण पुरून उरु,
अपुले स्वप्न साकारण्या आता
दिवस रात्रही एक करू,
एक दिलाने, एक मनाने
चला विजयाचा संकल्प करू ।।
मी पणाची बाधा आग्रही
संघटनेला तळास नेईल,
जर सावध झालो नाही
अनपेक्षित ते समोर येईल,
विचारांना सर्वस्व मानुनी
स्वार्थाला जरा दूर सारू,
एक दिलाने, एक मनाने
चला विजयाचा संकल्प करू ।।
शब्दरचना
पराग पिंगळे
यवतमाळ
दिनांक 21 ऑगस्ट 2021
संघटना कोणतीही असो मी पणाची बाधा ही सर्वांसाठीच घातक असते.राज्यात,संस्थेत,संघटनेत,पक्षात मी पणा मुळे एकमेकांचे पाय ओढणे सुरू होते आणि एक दिवस येतो की जेव्हा शिखरावर असलेली संघटना ही लयास जाते.प्रत्येकच शिखरावर असलेल्या संघटनेत नेते,कार्यकर्ते ह्यांच्यात मतभेद असतातच.पण जेव्हा युद्ध होते तेव्हा संघटनेसाठी एक होऊन लढणे आवश्यक असते,मन मोठे करणे आवश्यक असते.जर ते केले तर संघटन टिकते अन्यथा लयास जाते.इतिहासाची पाने चाळली तर आपल्याला हेच दिसून येईल की मोठ्या राजसत्ता ह्या लयास जाण्यास अंतर्गत वैमनस्यच कारणीभूत झाले.तेव्हा शिखरावर असतानाच सावध होणे आवश्यक असते.आणि विजय संकल्प करण्यासाठी व्यक्ती साठी नाही तर विचारांसाठी,राजासाठी नाही तर विचारांच्या ध्वजासाठी एक होणे आवश्यक असते .