मुलाला वाचवितांना आईचा मृत्यु

महागाव : तालुक्यातील बोथा शिवारात मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या आईचा जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने मृत्यु झाला असून, मुलगा गंभीर जखमी झाला. तर दोन गाई व एक श्वानही दगावला.
सुनिता सूनील मोरे (वय२६) रा.बोथा असे मृत महिलेचे नाव आहे. बोथा येथील माणिक चंपत मोरे यांच्या शेतालगत धनराज सुनील मोरे हा मुलगा गाई चारत होता. शेतात तुटुन असलेल्या वीज तारेला स्पर्श झाल्याने गाय खाली कोसळली. यावेळी सुनीता मोरे ह्या धनराजला वाचविण्यासाठी धाव घेऊन जिवंत विद्युत तारा बाजुला करण्याचा प्रयत्न केला असता. विजेचा प्रवाहामुळे त्यांना जबरदस्त धक्का लागला त्यासुध्दा खाली कोसळल्या होत्या. यावेळी त्यांना पुसद येथील मेडीकेअर रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत्यु झाल्याचे सांगितले. तर मुलगा धनराज हा रूग्णालयात भरती आहे. तसेच या जिवंत विद्युत तारेचा स्पर्श होऊन दोन गाय व एक श्वानही दगावल्याची माहिती नायब तहसीलदार डॉ. संतोष आदमुलवाड यांनी दिली.या घटनेची माहिती मिळताच महावितरणचे उपविभागीय अभियंता विनोद चव्हाण यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेवुन पाहणी केली. विज चोरी करणाऱ्या शेतकऱ्याविरोधात महागाव पोलिसांत तक्रार केली असुन तक्रारींवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आहे.