खरंच…आता कसं लढायचं?

घोडदौड थांबऊनी अपुल्यांनी
अमुच्या तलवारी म्यान केल्या,
उन्मत्त होऊनी त्यांनी
विद्वेषाला श्वास केला,
आता निशस्त्र उठायचं?
खरंच…आता कसं लढायचं?
कार्यकाळात आमुच्या आम्ही
कर्तुत्वाचा ध्यास केला,
पण पंख छाटूनी अमुचे
आपल्यांनीच विपर्यास केला,
आता पुन्हा कसं उडायचं?
खरंच…आता कसं लढायचं?
कार्यकुशल मावळे काही
आपुल्यानीच शहिद केले,
अपुले धीरोदात्त सवंगडी
मनातून काही मेले,
आता आक्रमण कसं करायचं?
खरंच…आता कसं लढायचं?
सांगा कश्या संपतील
या विद्वेषाच्या भिंती,
मन घायाळ होऊन आता
नसे उभारी आजमिती,
आता पुन्हा कसं नेतृत्व करायचं?
खरंच…आता कसं लढायचं?
आवेग विजयी परंपरेचा
आपुल्यानीच उध्वस्त केला,
दीपोत्सवाच्या वेशी
आता सुनसान झाल्या,
आता पुन्हा स्फुरण कसं चेतवायचं?
खरंच…आता कसं लढायचं?
प्रतिपक्षाचा विध्वंस केला,
भल्याभल्यांचा माज उतरवला,
पण अपुल्यांशी लढता लढता
तुमचा हा सैनिक घायाळ झाला,
आता पुन्हा विजयी रान कसं पेटवायचं?
खरंच…आता कसं लढायचं?
द्वेषाने अपुल्यानीच केले
निशस्त्र नरवीर-शूरवीर नेते,
असे सैन्यात आता
कर्तृत्व थोडे रिते,
आता पुन्हा सैन्य कसं उभरायचं?
खरंच…आता कसं लढायचं?
आदेश तो धोरणांचा
शिरसावंद्य असे आम्हाला,
जरी निशस्त्र असेल आम्ही
अमुचा शब्द आपल्याला,
आता फक्त तत्वांसाठी लढायचं
आणि आता जिंकायचं?
खरंच…आता लढायचे आणि जिनाकायचे …!!!
शब्दरचना
पराग पिंगळे
यवतमाळ
जीवनात अनेकदा आपली घोडदौड काही आपलेच सहकारी विद्वेषामुळे थांबवतात….,विरोधक अडवू शकत नाहीत कारण विरोधकांशी लढू शकणारे मन अपुल्यांशी लढतांना मात्र व्यतीथ होते.जीवनात प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्याला हा अनुभव येतोच.छत्रपती शिवराय,छत्रपती संभाजी महाराज,बाजीराव पेशवे ह्यांना देखील हाच अनुभव आला.पण थांबायचे नसते लढायचे असते….पण मन स्वतःलाच विचारते सांग कसे लढायचे ?