विदर्भ

विभागात यवतमाळ जिल्हा दुसरा

 

दहावीत कन्यारत्नांची बाजी
जिल्ह्याची 99.72 टक्केवारी; विभागात दुसरा क्रमांक, पाच तालुक्यांनी उंचावली मान

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता.16) ऑनलाइन पद्घतीने जाहीर करण्यात आला. यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लेखी परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल लावण्यात आला. दहावीच्या निकालात नेहमीप्रमाणेच कन्यारत्नांनी बाजी मारली. तर, पाच तालुक्यांनी निकालात मान उंचावली. जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी 99.72 इतकी आहे.
राज्य शिक्षण मंडळामार्फत 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आणि ते संगणक प्रणालीत नोंदविण्यासाठी माध्यमिक शाळांना ठराविक कालावधी देण्यात आला होता. नववीचा अंतिम निकाल, दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन, अंतिम तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुणदान करण्यात आले. जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 38 हजार 69 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी 37 हजार 959 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलामुलींची एकत्रित टक्केवारी 99.71 आहे. प्रावीण्य श्रेणीत 17 हजार 477, प्रथम श्रेणीत 17 हजार 189, द्वितीय श्रेणीत दोन हजार 88 आणि एक हजार 205 विद्यार्थी पास झाले. दरवर्षीपेक्षा निकालाचा आकडा चांगलाच फुगला. अमरावती विभागात निकालात जिल्ह्याचा क्रमांक दुसर्‍यास्थानी आहे. नेर, आर्णी, राळेगाव, मारेगाव, घाटंजी या पाच तालुक्यात मुलींनी बाजी मारल्याने टक्केवारी शंभरपैकी शंभर आहे. जिल्ह्यात मुलांच्या निकालाची टक्केवारी 99.64 तर मुलींची 99.71 आहे. 20 हजार 358 मुले, 17 हजार 711 मुली परीक्षेसाठी पात्र होत्या. त्यात 20 हजार 286 मुले तर, 17 हजार 673 मुली उत्तीर्ण झाल्या.

तालुकानिहाय टक्केवारी

तालुका -मुले-मुली
यवतमाळ-99.81-99.60
नेर-99.67-100
दारव्हा-99.13-99.50
दिग्रस-99.15-99.45
आर्णी-99.91-100
पुसद-99.76-99.86
उमरखेड-99.49-99.77
महागाव-99.62-99.66
बाभूळगाव-99.83-99.78
कळंब-99.51-100
राळेगाव-99.51-100
मारेगाव-100-100
पांढरकवडा-100-99.90
झरी-100-99.77
वणी-99.76-99.83

 

‘लिंक’ओपनचा ताप
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल ठिक एक वाजता ऑनलाइन पद्घतीने जाहीर करण्यात आला. मात्र, लिंक ओपन न झाल्याने शिक्षकांच्या डोक्याचा ताप चांगलाच वाढला होता. आपल्या शाळेतील कोणत्या विद्यार्थ्याला किती गुण मिळाले, हे बघण्यासाठी शिक्षकांना चांगलीच कसरत करावी लागली. दुपारी उशीरापर्यंत लिंक ओपनची डोकेदुखी कायम होती.
……………………………

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!