‘आधी फी द्या, मगच टिसी गुणपत्रीका मिळणार’

यवतमाळ
स्थानिक फ्री मेथॉडिस्ट मिडियम हायस्कूल शाळेकडून शैक्षणिक सत्र २०२०-२१ची १०० टक्के फि वसूल करण्यात येत आहे. आणि फि दिल्याशिवाय विद्यार्थ्यांची टीसी, गुणपत्रिका देणार नाही, असे पालकांना सांगण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शाळेमार्फत विद्यार्थ्यांना १०० टक्के अध्यापनच झालेच नाही, त्यामुळे यांना १०० टक्के फि कुठून द्यावी, असा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. या गंभीर प्रकाराबाबत पालकांनी राज्यमंत्री बच्चु कडू यांना शुक्रवारी (ता.१५)ला निवेदन दिले आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे राज्य शासनाने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याकरीता विविध मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या. त्यानुसार शाळेने आभासी पद्धतीने अध्यापनाद्वारे शिकविलेले नसतांनाही १०० टक्के फी सक्तीने वसुल करीत आहे. हे चुकीचे अाहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या गंभीर प्रकाराकडे राज्यमंत्री बच्चु कडू, जिल्हाधिकारी, सीईओ, शिक्षणाधिका-यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनावर संदीप चव्हाण, विनय सुखदेवे, वर्षा मेश्राम, विनोद वासनिक, सारीका मानकर, संगीता गजभिये, पायल नानवतकर, अनिता रामटके, विजय खोब्रागडे, श्रीकांत हिवराळे, संजय तिरपूडे, भारती धवने, करुणा चौधरी, वंदना सानप, मनीषा दाभाडे, ममता सावरकर, सरिता सुखदेवे, अतुल गणवीर, सिताराम राठोड, गणेश कवडे, अर्चना धात्रक, कल्पना फुलमाळी आदी पालकांच्या स्वाक्षरी आहेत.
कोरोनामुळे आर्थिक गाडा विस्कळीत
गेल्या २ वर्षांपासून कोरोनामुळे हातचे काम गेले अशा परिस्थितीत संसाराचा गाडा विस्कळीत झाला आहे. परिवारात ताण, तणाव, चिडचिडपणा आहे. अनेकांचा रोजगार गेल्याने उदरनिर्वाहाचे संकट उभे राहिले आहे. निर्बंध शिथिल झाल्याने आता गाडा रुळावर येईल अशी अपेक्षा आहे. परंतु, शाळेने सक्ती करायला नाही पाहिजे, अशी प्रतिक्रीया यावेळी पालकांनी दिली.