विदर्भ

लाभार्थ्यांची अडवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही – जि.प. अध्यक्षा कालिंदा पवार

 

महागाव पंचायत समितीचा आढावा

वाकोडी येथील ग्रामसेवकांवर कारवाईचे निर्देश

सतीश बाळबुधे / यवतमाळ 
वैयक्तिक योजनांचा लाभ मंजूर करतांना तसेच त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत जर कोणी संबंधीत लाभार्थ्यांची शेतकऱ्यांची अडवणूक करीत असेल तर अशा कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांचेवर कठोर कारवाई केली जाईल, अशी सुचना जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदाताई पवार यांनी केली. त्या मंगळवारी (ता.13) महागाव पंचायत समिती अंतर्गत तहसिल कार्यालयात घेण्यात आलेल्या नियोजित आढावा बैठकीत बोलत होत्या.
ही आढावा बैठक जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.कालिंदाताई यशवंतराव पवार यांचे अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, पंचायत समिती सभापती, उपसभापती जि.प. व पं.स. सदस्यांचे उपस्थितीत आढावा घेण्याचे आयोजन पंचायत समिती महागाव अंतर्गत तेथील तहसिल कार्यालयातील सभागृहात करण्यात आले होते. सभेमध्ये जि.प. सदस्य व पं.स.सदस्यांनी वाकोडी येथील ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीला उपस्थित राहत नाहीत. तसेच नागरीकांना दाखले व आवश्यक माहिती घेणे, योजनांचे अर्ज दाखल करणे व शिफारस घेण्यास अडचणी येतात. त्यांच्यामुळे गावातील विकास कामे अपूर्ण आहेत ते मार्च महिन्यापासून गावात आले नाही, अशी तक्रार करण्यात आली. त्यावर जि.प.अध्यक्ष सौ.कालिंदाताई पवार यांनी सदर तक्रारीची सखोल चौकशी करुन संबंधीत ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचे गट विकास अधिकारी यांना निर्देश दिले. आरोग्य विभागाचा आढावा घेतला असता महागाव तालुकयातील वडद येथील १००% नागरीकांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी यांनी सांगितले. पंचायत विभागाकडून ग्रामपंचायती कडील कर वसुलीचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये तफावत असल्याचे आढळून आले. ग्रामपंचायत कर वसुली संदर्भात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याबाबत गट विकास अधिकारी यांना निर्देश दिले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना सॅनेटरी नॅपकीनची विल्हेवाट लावण्या करीता प्रती ग्रामपंचायत एक याप्रमाणे सॅनेटरी नॅपकीन इन्सीनेटर मशिन जिल्हा स्तरावरुन पुरविण्यात आल्या. सदरच्या मशिन कार्यान्वयीत नसल्याबाबत सभेत सांगण्यात आले. सदर मशिन पुरवठा करतांना स्थानिक सरंपच जि.प. व पं.स. सदस्यांना विश्वासात घेतले नाही, अशी तक्रार करण्यात आली. त्यावर या बाबतची सखोल चौकशी करुन अहवाल सादर करण्याबाबत गट विकास अधिकारी यांना निर्देश दिले. नरेगा विभागाचा आढावा घेतला असता वैयक्तिक योजनांचा लाभ मंजूर करतांना तसेच त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत जर कोणी संबंधीत लाभार्थ्यांची शेतकऱ्यांची अडवणूक करीत असेल तर अशा कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांचेवर कठोर कारवाई केली जाईल, अशी सुचना केली. यासह बांधकाम, घरकुल, बालविकास, आरोग्य, पाणी पुरवठा, शिक्षण इत्यादी विषयाचा सविस्तर आढावा घेण्यात आला….
आढावा सभेला बांधकाम व अर्थ सभापती श्री रामभाऊ देवसरकर, शिक्षण व आरोग्य सभापती श्री श्रीधरभाऊ मोहोड, पंचायत समिती सभापती सौ.अनिता चव्हाण, श्री अशोक जाधव, सौ.वर्षाताई भवरे, श्री.विलास भुसारे, उपसभापती रामचंद्र तंबाखे, पंचायत समिती सदस्य श्री.शिवाजीराव देशमुख, श्री.गजानन कांबळे, श्री.अर्जुन राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण श्री.विशाल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस.चव्हाण, कार्यकारी अभियंता बांधकाम व सिंचन श्री भुमेश दमाहे, गट विकास अधिकारी श्री.मयुर अदेलवाड यांचेसह पंचायत समिती स्तरावरील विविध विभागाचे खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!