ब्रेकिंग

CID फेम इन्स्पेक्टर दया जेव्हा गार्गी, गायत्रीला यशाचा मंत्र सांगतात तेव्हा !

 

‘दया दरवाजा तोडो…’ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या CID मालिकेतील हा प्रसिद्ध संवाद. १९९८ पासून CID ची जादू छोट्या पडद्यावर आजही कायम आहे. कॉलेजला असताना CID नुकतीच सुरु झाली होती. ACP प्रद्युम्न, इन्स्पेक्टर दया, अभिजित ही सर्व पात्र आपल्या आजूबाजूला वावरत असावी, इतकी ही मालिका आयुष्यात रूळली. हे सर्व सांगायचे कारण म्हणजे, CID चे दिवाने आपणच नव्हतो, तर आताची मोबाईल पिढी सुद्धा या मालिकेवर आणि त्यातील पात्रांवर तेवढीच प्रेम करते, याचा प्रत्यय गेल्या काही वर्षांपासून घरातच येत आहे.
आपल्या आयुष्यात कोरोनाचा प्रवेश झाला आणि घरातील लहान, मोठे, सर्वांच्याच वाट्याला चार भिंती आडचे जगणे आले. या काळात अनेक घरात TV आणि मोबाईल हेच विरंगुळयाचे साधन ठरले. आमचेही घर त्याला अपवाद कसे ठरेल?

गेल्या दीड वर्षांपासून माझ्या मुली गार्गी, गायत्री यांचाही स्क्रीन टाईम आपसूकच वाढला. पूर्वी शाळा, ट्युशन, खेळ यातून वेळ मिळाला तर सायंकाळी कधीतरी त्यांच्या हातात येणारा रिमोट हल्ली ऑनलाईन क्लास संपले की, या दोघींच्या ताब्यात असतो. त्यातून आजोबा, नातींचा बातम्या विरुद्ध मालिका असा वादही रंगतो. पण अखेर आजोबा नमते घेतात. यातूनच गार्गी, गायत्री रिपीट टेलिकास्ट होत असलेल्या CID च्या फॅन कधी झाल्या ते आम्हालाही कळले नाही. CID तील इन्स्पेक्टर दयाचे पात्र तर घरात २४ तास ठाण मांडून घरभर उपद्व्याप करणारे. गार्गी दयाची एवढी फॅन झाली की, दयाच्या CID सह अनेक सीरिअल, सिंघम रिटर्न हा सिनेमा किती वेळा बघितला जात असेल, याच्या नोंदी घेणेही आम्ही आता बंद केले. दया (दयानंद शेट्टी), सिंघम (अजय देवगण) ही पात्र म्हणजे गार्गीच्या दिनचर्येतील अविभाज्य भाग झालेत. मोठं होऊन सिंघम, दया सारखे पोलीस ऑफिसर व्हायचे यावर सध्यातरी शिक्कामोर्तब झालेले आहे. आम्ही पालक म्हणून मात्र हिचे कसे होईल, या चिंतेत! पण हिचे दया, सिंघम प्रेम दिवसेंदिवस वाढतच चाललेले. त्यात या दोन हिरोंना (अजय देवगण, दयानंद शेट्टी) प्रत्यक्ष भेटण्याचे खूळ गार्गीच्या डोक्यात शिरले. त्यासाठी युट्युबवरून या दोघांचीही जमेल तेवढी माहिती दोघींनी मिळविली. मुंबईतील त्यांची घरे, कुटुंबातील सदस्यांची नावे, त्यांचे इन्कम ही सर्व माहिती युट्युबने विनासायास पुरविली. मात्र त्यातील फोलपणा दोघींच्याही लक्षात आला असावा. मी या दोघांना युट्युबवर सर्च करतो म्हटलं तर गार्गीच म्हणाली, ती माहिती फेक असते, काहीही दाखवतात, सांगतात त्यात!

आता या दोघांपर्यंत पोहोचण्याचा अखेरचा पर्याय म्हणजे बाबाच (म्हणजे मी). मग काय माझ्या मागे घोषा सुरू झाला, आम्हाला मुंबईला घेऊन चला, दया आणि सिंघमला भेटायचेच आहे. त्यासाठी देवाकडे, आभाळाकडे ‘विश’ मागितल्या गेल्या, माझ्याकडून भेट करून देण्याचे ‘प्रॉमिस’ घेण्यात आले. आता त्या निश्चिन्त होत्या. त्यांना विश्वास आला होता की, आपला बाबा नक्कीच काहीतरी जादू करणार! एक आठवडा यावर माझ्याकडून काहीच हालचाल झाली नाही. एक दिवस अचानक शुभम पाटील (शुभ सेलिब्रिटी मॅनेजमेंटचे डायरेक्टर)चा फोन आला. इकडचे तिकडचे बोलणे सुरू असताना, मला अचानकपणे दया आणि सिंघमच्या भेटीची आठवण झाली. मुलींचा हट्ट काय ते शुभमला सविस्तरपणे सांगितले. मात्र अजय देवगणची भेट, व्हीडिओ कॉल मिळवणे कठीण जाईल, हे शुभमने स्पष्ट केले. पण दयानंद शेट्टीसाठी प्रयत्न करू, असा शब्द त्याने दिला. तो तिकडे कामी लागला. दयानंद शेट्टी (इन्स्पेक्टर दया)च्या सहाय्यकाशी त्याचा संपर्क झाला. त्याला गार्गी, गायत्री दयाच्या किती फॅन आहेत, हे सांगितले. कोरोना काळात दयाची भेट शक्यच नव्हती. मात्र दयाने जर या दोघींसाठी काही ‘मोटीवेशनल’ व्हीडिओ करून दिला तर..! ही कल्पना सांगितली. त्यात आठवडा निघून गेला.

गुरुवारी ३ जूनला सायंकाळी शुभमने माझ्या व्हाट्सपवर एक व्हीडिओ टाकला. सायंकाळी तो मी बघितला आणि उडालोच! चक्क दयानंद शेट्टीने त्या व्हीडिओच्या माध्यमातून गार्गी, गायत्रीसाठी शुभेच्छा संदेश करून पाठविला होता. खरे तर हा माझ्यासाठीही धक्काच होता. मुलींना गम्मत म्हणून केलेले प्रॉमिस खरे ठरले होते, हा बाप म्हणून माझ्यासाठी रोमांचकारी क्षण होता. आता कसोटी होती गार्गी, गायत्रीची. खासकरून गार्गीची! हा व्हीडिओ बघताना तिच्या फिलिंग्ज, देहबोली कशी राहील, याची उत्सुकता मला लागली होती. रात्री निवांत दोघींनाही हा व्हीडिओ दाखवला तेव्हा, त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड कुतूहल आणि अविश्वसनीय असे भाव होते. हे कसे काय शक्य आहे, बाबा तू हे काय केले, दया कशाला आपल्याला व्हीडिओ पाठवेल, असे प्रश्न होते. अवघ्या काही क्षणात गार्गीच्या डोळ्यातून आसू टपकणे सुरू झाले. अर्थात बाबांनी तिचे ड्रीम पूर्ण केल्याचे, आवडत्या हिरोने नाव घेऊन मौलिक संदेश दिल्याचे हे आनंदाश्रू होते. पण या सीनने काही काळ घरातील वातावरण भावुक झाले. यावेळी तिने रडत, रडतच मारलेली मिठी माझ्यासाठी पुरस्कार होता!

काय म्हणाले दया, तर, ‘खेळा, मजा , मस्ती करा, टीव्हीही बघा पण शिक्षणास प्राधान्य द्या. उच्च शिक्षण घ्या, शिक्षणास कुठलाही पर्याय नाही. कष्टापासून दूर पळू नका, यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो. आई-वडिलांना प्रेम द्या, त्यांचे म्हणणे ऐका, तुम्हाला खूप जास्त सक्सेस मिळेल!’ दयानंद यांनी दिलेल्या या संदेशाने केवळ गार्गी, गायत्रीच नव्हे तर सर्वांनाच यशाची दारं खुली करून देणारा मोलाचा खजिना गवसावा.
(दयानंद शेट्टी स्वतः वेटलिफ्टिंगचे चॅम्पियन आहेत. प्रसिद्ध अभिनेता आणि यशस्वी उद्योजक आहेत.)

@नितीन पखाले, यवतमाळ 

📲📲📲 9403402401

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!