अतिरिक्त बील आकारणे भोवले; सहा रुग्णालयांना नोटीस

48 तासात उत्तर सादर करण्याचे निर्देश
यवतमाळ : जिल्ह्यातील खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये भरती असलेल्या रुग्णांकडून मनमानी बील घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहे. जिल्हा प्रशासनाने या रुग्णालयात ऑडीटर नियुक्त केले आहे. या ऑडीटरांनी बिलांच्या तपासण्या करून जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर केला. त्यानुसार यवतमाळ शहरातील सहा खाजगी कोव्हीड रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली आहे.
धवणे हॉस्पीटल, यवतमाळ कोव्हीड केअर सेंटर, उजवणे हॉस्पीटल, क्रिटीकेअर हॉस्पीटल, राठोड इन्टेंसिव्ह केअर युनीट आणि महालक्ष्मी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल अशी हाॅस्पीटलची नावे आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरीता शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यामध्ये 24 खाजगी रुग्णालयांना डेडीकेटेड कोव्हीड केअर सेंटर म्हणून मान्यता देण्यात आली. कोरोनाबाधित रुग्णांकडून कोणत्याही प्रकारचे जादा शुल्क आकारणी होऊ नये, याकरीता निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांची सनियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
रुग्णालयात नियुक्त केलेल्या ऑडीटर यांनी बिलाच्या तपासण्या करून जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर केला. त्यानुसार अतिरिक्त बील आकारल्याप्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांच्या स्वाक्षरीने सहा खाजगी कोव्हीड हॉस्पीटलला नोटीस देण्यात आली आहे. यात धवणे हॉस्पीटल, यवतमाळ कोव्हीड केअर सेंटर, उजवणे हॉस्पीटल, क्रिटीकेअर हॉस्पीटल, राठोड इन्टेंसिव्ह केअर युनीट आणि महालक्ष्मी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचा समावेश आहे. सदर हॉस्पीटलला नोटीस मिळाल्यापासून 48 तासात उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. विशेष म्हणजे रुग्णालयांचे उत्तर समाधानकारक नसल्यास वसुलीबाबत पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.