आरोग्य व शिक्षणराजकीयविदर्भ

राजुदास जाधव यांचा जिल्हा बँकेचे सदस्यत्व राखण्यासाठी खटाटोप, पतसंस्थेच्या सभासदांचा आरोप

यवतमाळ : सेवानिवृत्तीनंतर जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर राहणे हे उपविधीनुसार अयोग्य आहे. त्यामुळे पतसंस्था अध्यक्ष राजूदास जाधव व उपाध्यक्ष एकनाथ गाडगे यांनी नैतिकता पाळून सन्मानाने पद सोडावे अशी मागणी यवतमाळ जि.प.कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांनी पत्रपरिषदेत केली आहे. विद्यमान अध्यक्ष हे पतसंस्था गटातून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सदस्यपदी निवडून गेले आहेत. ते जर पतसंस्थेचे सभासद राहिले नाही तर त्यांचे मध्यवर्ती बँकेचे सदस्यपदही नियमाने रद्द होते. त्यामुळे अध्यक्षांचा हा आटापिटा सुरु आहे.
सहकारी पतसंस्थेच्या उपविधीतील तरतुदीनुसार निवृत्तीनंतर पतसंस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे सभासदत्व संपुष्टात आले आहे. ते जिल्हा परिषदेच्या कोणत्याही आस्थापनेवर सेवकपदी कार्यरत नाहीत. पतसंस्थेचे अध्यक्ष राजूदास जाधव हे कायम नैतिकतेचा आव आणतात. ते सध्या राज्य फेडरेशनचे उपाध्यक्ष आहेत. जिल्हा बँकेचे सदस्य आहेत, त्यांना सहकार संत पुरस्कार प्राप्त आहे. ते प्रवचनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करतात. त्यामुळे अशा व्यक्तीचा अनेक वर्ष जे पद भूषविले त्यावर आणखी काही काळ राहण्याचा अट्टाहास त्यांच्यासाठी भूषणावह नाही. शिवाय तो बेकायदेशीरही आहे असा आरोप यावेळी करण्यात आला. विद्यमान संचालक मंडळाकडे पूर्ण बहुमत असल्याने अध्यक्षांनी राजीनामा देऊन अन्य संचालकांकडे पदाचा प्रभार देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन सभासदांनी केले.

२१ मार्चला पतसंस्थेची आमसभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र पतसंस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवृत्तीमुळे अपात्र ठरतात. त्यामुळे हि सभा पूर्णपणे बेकायदेशीर आहे. पतसंस्था संचालक मंडळाची मुदत संपली आहे. मात्र कोरोना मुळे मुदतवाढ मिळावी असून सध्या असलेले संचालक मंडळ हे काळजीवाहू आहे. त्यामुळे येत्या आमसभेत धोरणात्मक निर्णय घेण्यात येऊ नयेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली. पत्रपरिषदेला मधुकर काठोडे, साहेबराव पवार, ज्ञानेश्वर नाकाडे. मुकेश भोयर, संजय गावंडे, तुषार आत्राम, रमाकांत मोहरकर, किरण मानकर, दिलीप कुळमेथे, प्रदीप खंडाळकर, शरद घारोड, गजानन पोयाम, पुंडलिक बुटले, विशाल ठोंबरे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!