शिक्षक महिलेने चिमुकलीसह घेतली विहिरीत उडी, माय-लेकींचा मृत्यू

मारेगाव (यवतमाळ) : महिलेने चिमुकलीसह विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची हृदयद्राव घटना घडली. आज शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास प्रभाग क्रमांक १२ मध्ये विश्रामगृह परिसरातील ही घटना उघडकीस आली. कोमल उमेश उलमाले (३३) , श्रृती उमेश उलमाले (२) अशी मृतक मायलेकीची नावे आहे.
मारेगाव येथील स्टील भांडे व्यवसायिक उमेश उत्तमराव उलमाले यांचा विवाह सन २०१२ मध्ये वणी येथील मधुकर झाडे यांच्या कोमल नामक मुलीशी झाला होता. उमेश व कोमल यांना आठ वर्षाची श्रेया व दोन वर्षाची श्रुती ह्या दोन मुली होत्या. मृतक कोमल ही मारेगाव येथील एंजल कॉनव्हेंट मध्ये प्राचार्य पदावर कार्यरत होती. हम दो हमारे दो सह आई वडील असे कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत होते. मागील चार दिवसापासून उमेश यांची प्रकृती ठीक नसतांना शुक्रवारच्या रात्री सर्वांनी एकत्र बसुन घरी भोजन केले..आपल्या रुम मध्ये उमेश , कोमल व दोन मुली झोपी गेले. दरम्यान रात्री पावणे अकरा वाजता उमेशला जाग आली. तेव्हा पत्नी व लहान मुलगी दिसत नसल्याने शोधाशोध सुरू केला. रात्री उशिरा पर्यंत नातेवाईकासह आप्तेष्ठीँना विचारपूस केली मात्र कुठेच थांगपत्ता लागला नाही. सकाळी पोलिसात कळवून मोबाईल लोकेशन घेण्यात आले. मोबाईल लोकेशन मारेगावातील प्रभाग क्रं.६ मध्ये असलेल्या मोबाईल टॉवर जवळ दाखविण्यात आले. मात्र कोमलचा शोध लागला नव्हता. अशातच स्व .चिंधूजी पुरके आश्रम शाळेच्या बाजुला काही अंतरावर असलेल्या विजय थेरे यांच्या शेतातील विहिरीत दुधाची बॉटल व चपला तरंगतांना काहींच्या निदर्शनास आल्या. विहिरीत गळ टाकण्यात आल्यानंतर दोन वर्षीय श्रुतीचा मृतदेह व काही वेळात आई कोमल हिचा मृतदेह गळाला लागला. उच्चशिक्षीत असलेल्या कोमलने आपल्या चिमुकलीला घेवुन जीवनयात्रा संपविल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट आहे. पोलिसांनी घटनास्थळावर विहिरीतील मायलेकीचे मृतदेह बाहेर काढून येवुन उत्तरीय तपासणी साठी मृतदेह ग्रामिण रुग्णालयात पाठविले.