
यवतमाळ : कोरोनाचे रुग्ण वाढल्याने बाभूळगाव तालुक्यातील वाटखेड बू. व आर्णी तालुक्यातील गणगाव येथील काही भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून प्रशासनाने घोषित केले आहे.
बाभुळगाव येथील कोविड – 19 सेंटर, क्षमता लक्षात घेता वाटखेड येथील रुग्णांना प्रतिबंधित क्षेत्रामध्ये गृहविलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र गृहविलगीकरणामध्ये ठेवण्यात आलेले रुग्ण नजर चुकवून गावामध्ये इतर कोणत्याही कामाकरीता जाणे – येणे करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे कोविड- 19 चा प्रसार व प्रभाव वेगाने होण्याची शक्यता आहे. सदर बाबी विचारात घेता मौजा वाटखेड बू. येथील कोविड – 19 ची रुग्ण संख्या मर्यादित ठेवणे व गावातील संसर्ग संपविण्याचे दृष्टीने संपूर्ण गाव पुढील 15 दिवसाकरीता प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत उपविभागीय अधिकारी यवतमाळ यांनी प्रस्तावित केले आहे. त्यानुसार मौजा वाटखेड बू. हे संपूर्ण गाव 15 दिवसाकरीता प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे. वरील नमुद क्षेत्रात प्रतिबंधित आराखड्यानुसार कार्यवाही करण्याबाबत आदेशित करण्यात येत आहे. सदर आदेशाची प्रसिध्दी देण्यासंबंधाने संबंधीत पोलीस स्टेशन अधिकारी, बाभुळगाव व सचिव, ग्रामपंचायत वाटखेड बू. यांनी कार्यवाही करावी.
गणगाव येथील काही भाग प्रतिबंधित घोषित
आर्णी तालुक्यातील मौजा गणगाव येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने सदर रुग्णाच्या घराच्या परिसरातील भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत प्रस्तावित केले आहे. त्यानुसार आर्णी तालुक्यातील मौजा गणगांव येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या घराच्या परिसरातील भाग प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असून सदर भागाच्या सिमा पुढील आदेशापावेतो बंद करण्याचा आदेश देण्यात येत आहे.