संपादकीय व लेख

१९ मार्चला शेतकऱ्यांच्या चिरवेदनेचे स्मरण करावयाचा दिवस

यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण हे गाव प्रचंड आक्रोश करीत होते. नागपूर-जिंतूर या गाडीने आणलेल्या वृत्तपत्राने चिलगव्हाणच्या काळजाचा ठोका चुकवला होता. १९ मार्चला यात्रेच्या निमित्ताने बाहेर गेलेल्या साहेबराव करपे व त्यांच्या कुटुंबियानी केलेल्या सामूहिक आत्महत्येची बातमी घेवून आले होते वृत्तपत्र. आज एवढ्या वर्षानंतरही ती बातमी गावाच्या काळजाला छिन्नविछीन्न करते. गेल्या ३५ वर्षात गाव साहेबराव करपेना विसरू शकले नाही. वर्धा जिल्ह्यातील दत्तपूर आश्रमात १९ मार्च १९८६ ला साहेबराव यांनी त्यांची पत्नी व चार चिमुकल्यांना विषयुक्त अन्न दिले व स्वतःलाही संपवले. शासनाची शेतकरीविरोधी धोरणे व त्यातून शेतीव्यवसायात आलेले अपयश हेच त्या सामूहिक मरणकांडामागील मुख्य कारण होते.
बळीराजा म्हणून ज्याचा सन्मान केला जातो त्याने आयुष्याला झिडकारून मृत्यूला कवटाळण्याची अव्याहत मालिका गेले ३५ वर्ष सुरु आहे त्याची सुरूवात करपे कुटुंबाच्या आत्महत्येनं झाली होती. चिलगव्हाण परिसरात शेषराव करपे यांचे मोठे प्रस्थ होते. साहेबराव व प्रकाश ही दोन मुले व एक मुलगी असे हे कुटुंब. अर्धा एकर परिसरात असलेला भव्य वाडा अन त्या वाड्यात असणारा माणसांचा गोतावळा हे त्या वाड्याचे वैभव. शेषराव करपे यांच्याकडे सव्वाशे एकर जमीन. संगीतावर मनापासून प्रेम करणारे हे कुटुंब. गावातील तरुणांना संगीताचे धडे द्यावे ही या कुटुंबाची धडपड होती. म्हणूनच गाव व परिसरातील तरुणांसाठी त्यांनी संगीताचे मोफत वर्ग उघडले होते. साहेबराव करपे हा माणूस सुद्धा संगीत विशारद होता. संगीतावर एवढे जीवापाड प्रेम करणाऱ्या साहेबराव यांचे आयुष्य शेतीच्या दुरवस्थेमुळे बेसूर झाले अन् १९ मार्च १९८६ ला त्यांच्या आयुष्याचीच भैरवी झाली. आज ३४ वर्षांनंतरही त्या आठवणी ताज्या झाल्या की चिलगव्हाण मूक आक्रंदन करते. तो चिरेबंदी वाडा आता :शब्द झालेला आहे. वाड्याचा मालक बदलला आहे, आता सव्वाशे एकर जमिनीपेकी एक फूटही जागा करपे कटंबाकडे नाही. आता करपे गावाला पोरके जरी झाले असले तरी गाव मात्र मात्र त्यांच्या आठवणीने व्या होतो. कासावीस होतो. साहेबराव करपे नावाचा हा तरुण धडाडीने काम करायचा. तब्बल १५ वर्षे तो गावाचा सरपंच होता. १२५ एकर जमीन व त्यासाठी जवळपास २४ माणसं त्यांच्या हाताखाली असायची. १० एच.पी.ची मोटर त्यांच्या विहिरीवर होती. शेतात नवीन प्रयोग करावे व त्यातून इतरांना प्रेरणा द्यावी म्हणून साहेबराव करपे यांनी शेतात केळी लावली. बँक व खाजगी कर्ज डोक्यावर होतेच. अशातच एमएसईबीने त्यांच्या घराची व शेतीची वीज कापली. आत्मसन्मावर दरोडा घालणारा हा प्रसंग साहेबराव यांच्या मनावर खोल परिणाम करून गेला. खचलेल्या लोकांचा आधार असलेला हा तरुण स्वतःच आतून पूर्ण खचला. आता जगायचं तरी कशाला हा विचार त्याच्या मनात आला. आपल्या पतीच्या मनातील काहूर मालतीच्या लक्षात आलेले नव्हते.
१९ मार्च १९८६ – यात्रा मृत्यूमार्गाची
१९ मार्च १९८६ ला साहेबराव, मालती व विश्रांती, मंगला, सारिका व भगवान या मुलांसह यात्रेला जातो असे सांगून वर्धा जिल्ह्यातील दत्तपूर आश्रमात गेले. जाण्यापूर्वी मुलगा भगवान त्याच्या मावशीकडे होता. त्यालाही उद्या परत येवू असे सांगून साहेबरावांनी सोबत घेतले. पत्नी व चार लेकरांना बापाच्या मनात काय चाललं आहे माहीत नव्हते. साहेबरावाने झिंक फॉस्फेट व डेमॉक्रॉन ही घातक रसायने सोबत घेतली होती. दत्तपूर आश्रमात ते पोहोचले तेव्हा साहेबराव अस्वस्थच होता. तिथे गेल्यावर त्याने झिंक फॉस्फेट लावलेली भजी विश्रांती, मंगला व सारिकाला खावू घातली. भगवानला डेमॉक्रॉन पाजले. भगवानचा जीव जात नव्हता तर त्याच्या अंगावर घोंगडे टाकून नारळाच्या दोरीने त्याला संपवले. चार मुलांचा जीव गेल्यानंतर मालतीला व नंतर स्वतःला साहेबरावाने संपवले. तत्पूर्वी त्याने पाचही जणांच्या कपाळावर एक रुपयाचे कलदार (नाणे) ठेवले. स्वतःला संपविण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली. या चिठ्ठीत त्याने आपली वेदना व्यक्त केली आहे. स्वतःला मृत्यूच्या स्वाधीन करण्यापूर्वी संगीतप्रेमी साहेबराव करपे यांनी ‘येऊ दे दया आता तरी गुरुमाऊली’, या आयुष्याची दोरी कमी जाहली” हे भजन म्हटले. १९ मार्च १९८६ ला रात्री १२ वा. ४५ मिनिटांनी हे थरारनाट्य संपले. दुसऱ्या दिवशी या सामूहिक आत्महत्याकांडाने अख्खा महाराष्ट्र हादरला. चिलगव्हाण गाव सुन्न झाले होते. साहेरावांच्या वाड्यासमोर सहा प्रेते जवळजवळ ठेवण्यात आली अन हजारो लोकांच्या साक्षीनं हे कुटुंब अग्नीच्या स्वाधीन होत काळाच्या उदरात गडप झालं. या घटनेस यंदा ३५ वर्षे पूर्ण होत आहेत. मागील वर्षी अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ हे आंदोलन ३४व्या स्मृतीदिनी करण्यांत आले. अभिषेक शिवाल या संवेदनाशील तरुणाचा या विषयावरील माहितीपट बर्लिन महोत्सवात पोहोचला. अमर हबीब नावाच्या एका ज्येष्ठ शेतकरी आंदोलकाच्या प्रेरणेने ‘अन्नत्याग’ आंदोलनाचा जन्म झाला. मात्र शेतक-यांची ही परवड थांबलेली नाही. कृषीप्रधान देश म्हणून मिरवताना शेती आणि शेतकरी यांना कोणत्याही पक्षानं, कोणत्याही मुख्यमंत्र्यानं आणि कोणत्याही सत्तेनं कधीच हात दिला नाही. मदतीच्या घोषणा, कर्जाची नाटकं आणि नुकसानभरपाईची आणेवारी यांचं राजकारणच केलं गेलं. आता तर मोर्चेकरी शेतकऱ्यांच्या तळपायाला आलेल्या फोडांचही राजकारण होत आहे. वेदना पेरा, दुःख उगवा आणि उपेक्षेचं पीक काढा ही अवहेलनेची साखळी ३५ वर्षे न चुकता सुरू आहे.
१९ मार्चचा उपवास कशासाठी?
“पंतप्रधान म्हणाले… घेतलेल्या कर्जाचं आणि कुटुंबाचं नियोजन करता येत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतात!
शेतकऱ्यांनी विचारलं देशाचं नियोजन जमलं नाही म्हणून किती पंतप्रधानांनी आतापर्यंत आत्महत्या केल्यात?’
शेतीमातीशी नाळ जुळलेल्या कवी इंद्रजीत भालेराव यांची ही कविता. ही केवळ कविता नाही तर शेती व्यवस्थेतील शोषणावर केलेला प्रहार आहे. हा देश शेतकऱ्यांचा आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आहे असा प्रश्न यानिमित्ताने इंद्रजित भालेराव यांनी विचारला आहे. देश बदल रहा है, अच्छे दिन आनेवाले है, मेक इन इंडिया, स्मार्ट सिटी, स्टार्ट अप इंडिया अशा घोषणा रोज कानावर पडतात. मात्र आमच्या शेत शिवाराशी या घोषणांचा तीळमात्रही संबंध नाही. पूर्वी हा देश शायनिंग इंडिया, गरीबी हटाव अशा घोषणा ऐकत होता. बनवाबनवी तिच आहे फक्त घोषणांचा स्वर बदललाय. ही घोषणांची बोटं अनेकांना गुदगुल्या करतात. मात्र दुसरीकडे या घोषणांच्या बोटांवर असलेली नखे शेतकऱ्यांना रक्तबंबाळ करतात. शेतीवर जगणारा ७० टक्के वर्ग या देशाला जगवत आलाय अन् देश चालवणारे या जगणाऱ्या वर्गास लुटत आले.उच्च शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी च्या प्रशंसायुक्त विधानांनी मात्र आपण कसे लुटले जात आहोत हे शेतकऱ्यांच्या लक्षातच आले नाही. तो कायम भ्रमातच राहिला. ज्या देशाला भूमीपुत्र गोतम बुद्ध, राजा बळी, छत्रपती शिवराय यांचा वारसा लाभला आहे त्याच देशातील शेतकरी मात्र मायबाप सरकारच्या क्रूर नीतीमुळे भयभीत झाला आहे. शेती व्यवस्थेतून तो आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल असे वातावरण दिसत नाही. लोकांचे लोकांसाठी असलेले सरकार मात्र लोकांसाठी कामच करत नाही हे शेतक-यांच्या एकंदर अवनती वरून आता सिद्ध झाले आहे. बळी तोच आहे फक्त वामनाने आपले रूप बदलले आहे. इंग्रजी राजवटीतही तो लुटला जात होता आणि आता काळ्या इंग्रजांकडूनही त्याची लूट कायमच आहे.सरकार कोणाचेही असो ते कायम या पोशिंद्याच्या विरोधातच असते हे सांगायला आता कुण्या कृषी अर्थतज्ञांची गरज नाही .शेतकऱ्यांनी रात्रंदिवस घाम गाळावा अन शेती न करणान्यांना जगवाव यालाच म्हणतात का हरितक्रांती? मन सुन्न करणारा हा प्रश्न आहे.निवडणुकीपूर्वी उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा देऊ, सातबारा कोरा करू, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू अशा घोषणा करायच्यात अन् सत्ताप्राप्तीनंतर मात्र चुनावी जुमल्याची भाषा करायची हा क्रूरपणा आहे.
यवतमाळ जिल्ह्याचे नाव संपूर्ण जगात शेतकऱ्यांची स्मशानभूमी म्हणून कुप्रसिद्ध आहे. कापसाचा शोध लावणारा हा जिल्हा शेतकरी आत्महत्यांचे रोल मॉडेल का झाले? याचा राज्यकर्त्यांना विसर पडला आहे. १९ मार्च १९८६ ला साहेबराव करपे यांनी कुटुंबासह आत्महत्या केली. खरंतर ही आत्महत्या नव्हती तर सरकारने पाडलेले खून होते. साहेबराव करपे यांच्या सहकुटुंब आत्महत्येनंतर आत्महत्त्यांचे सत्र कमी न होता दिवसेंदिवस वाढतच आहे. हरित क्रांतीचे तुणतुणे वाजवणारा पंजाबसुद्धा ह्याला अपवाद नाही. सन १९९३ ते २००३ या कालावधीत देशपातळीवर एक लाख २८२ शेतक-यांनी आत्महत्या केल्यात. सरकारी आकड्यानुसार सन २०१५ मध्ये महाराष्ट्रात ३२२८ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले.जे शेतकरी आत्महत्या केल्यानंतर मदतीस अपात्र ठरले त्या शेतक-यांची संख्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपेक्षा निश्चितच जास्त असू शकते. दवाखान्यात जाण्यासाठी पैसे नसल्यामुळे मरण आलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. औषध उपचाराविना आलेले मरण सुद्धा आत्महत्याच आहे.
अलीकडे तर आता शेतकऱ्यांची मुलं सुद्धा आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेताय. गणवेश व फी साठी पैसे नाही म्हणून विशाल खुळे नावाचा मुलगा आत्महत्या करतो, एसटीच्या पाससाठी २६० रुपये नाहीत म्हणून स्वाती पिठले नावाची मुलगी आत्महत्या करते. बापाला आपल्या लग्नाची चिंता नको म्हणून मोहिनी भिसे नावाची मुलगी आत्महत्या करते.दत्ता लांडगेसारखा उच्चशिक्षित तरुण शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करतो. शेती व्यवस्थेने बहाल केलेल्या या चिरंतन जखमांचा भाग त्यांच्या चिल्यापिल्यांना व्हावे लागत असेल, तर ही वेदनेची परिसीमा आहे.
कुणाची हटली गरिबी ? कुणाच्या वाट्याला आले अच्छे दिन ? कुठे आहे स्टार्ट अप इंडिया? असे एक ना अनेक प्रश्न मनाला सहस्त्र डंख करतात. मिरगाचा पाऊस पडण्याऐवजी आकाश मात्र चांदण्यांनी फुलून येत तेव्हा माझं शेत शिवारच माझ्यासाठी काळ ठरू लागलय यावर शिक्कामोर्तब होते. आजही शेतकऱ्यांच्या चंद्रमौळी झोपडीत जाऊन बघा, त्याच्या कुडाच्या भिंतीला कान लावून बघा … काळीज चिरणारे आवाज ऐकू येतील. आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या विधवांच्या डोळ्यांमधील तप्त अश्रू आणि तिच्या चिल्यापिल्यांच्या निरागस चेहऱ्यावरील लोप पावलेले हास्य तुम्हाला अस्वस्थ का करत नाही? मरणाचं छप्पर घेऊन जगणारी ही माणसं या देशाची नागरिक नाहीत का? हिंदुत्वाच्या नावाखाली राजकारण करणा-यांनो, काय शेतकरी हिंदू नाहीत? बहुजन वादाचा कंठशोष करणान्यांनो, काय शेतकरी बहुजन नाहीत?
पावलापावलावर सुरुंग पेरले आहेत.तू देशाच्या पाठीचा कणा आहेस असे सांगत त्याला शेतीत कष्ट उपसण्यास भाग पाडले जात आहे. सर्वत्र त्याची नाकेबंदी सुरू आहे. पहिल्या घटनादुरुस्तीने शेतकरी विरोधी कायद्यांना जन्म दिला. परिशिष्ट ९ जोडून त्यामध्ये दोनशेच्यावर शेतकरी विरोधी कायदे टाकले. आणि याच ठिकाणी बाबासाहेबांच्या स्वप्नाला सरुंग लागला. हे शेतकरीविरोधी कायदे रद्द झाले तरच शेतक-यांच्या जीवनात क्रांतीची एक पहाट येईल यासाठी ज्येष्ठ शेतकरी आंदोलक अमर हबीब यांनी साहेबराव करपे यांच्या सामूहिक बलिदानाचे बोट धरत रान पेटवले आहे. जगभरातील संवेदनशील माणसं १९ मार्चला अन्नदात्यासाठी अन्नत्याग करीत आहे. शेतकऱ्यांच्या मरणाची पूर्व मशागत करणाऱ्या यंत्रणेला जाग यावी म्हणून हे आंदोलन आहे. शेतात राबणारे सृजनशील हात, एका दाण्याचे हजार दाणे करणाऱ्या आणि पाखरांना दाणे खाऊ घालणाऱ्या संवेदनशील मनास विध्वंसक वाटेवर जाऊ द्यायचं नसेल तर या उपवासाची यंत्रणेने दखल घेणे गरजेचे आहे. हे अन्नत्याग आंदोलन शेती व्यवस्थेतील शोषणाला संपविण्यासाठी उचललेले पाऊल आहे. शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी केलेला हा संवेदनशील प्रयत्न आहे. आपणही या प्रयत्नात सहभागी होऊ या.

लेखक :- संतोष अरसोड (जेष्ठ पत्रकार तथा शेतकरी नेते)
अजंती ता. नेर जि. यवतमाळ
भ्रमणध्वनी : ९६२३१९१९२३

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!