ब्रेकिंगविदर्भ

कोरोनाबाधित रुग्णांचा दर १३ टक्क्यांवर,तीघांचा मृत्यू, ३६५ पॉझेटिव्ह

यवतमाळ : जिल्ह्याचा कोरोनाबाधित रुग्णांचा दर हा 13 टक्क्यांवर पोहचला आहे. हा दर पाच टक्क्यांपर्यंत खाली आणायचा असेल तर चाचण्यांची संख्या वाढविणे हा एकमेव पर्याय आहे. त्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी तालुकानिहाय चाचण्यांचे उद्दिष्ट निर्धारीत करून दिले आहे. या उद्दिष्टांची गांभिर्यपूर्वक पुर्तता करण्यासाठी सुपर स्प्रेडरसह बाजारपेठ तसेच विविध आस्थापनांमधील सर्व कर्मचा-यांची चाचणी करा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात व्हीसीद्वारे तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते.
जिल्ह्याला दिलेले पाच हजार चाचण्यांचे उद्दिष्ट कोणत्याही परिस्थितीत रोज पूर्ण व्हायलाच पाहिजे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्याच्या कोरोना स्थितीबाबत वरिष्ठ अधिका-यांकडून नियमित आढावा घेऊन सुचना दिल्या जात आहे. या सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे तालुकास्तरीय यंत्रणेचे मुख्य काम आहे. रोजच्या उद्दिष्टांपेक्षा कोणत्याही तालुक्याच्या चाचण्या कमी होणार नाही, याची दक्षता घ्या. यवतमाळ, पुसद, दिग्रस, दारव्हा, बाभुळगाव आदी तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे. गृह विलगीकरणात राहणारे नियमांचे उल्लंघन करीत असल्यामुळे अपवादात्मक परिस्थिती वगळता यापुढे कोणालाही ही सुविधा देऊ नये. दिग्रसमध्ये सर्वांनाच गृह विलगीकरणाची सुविधा का देण्यात आली, याबाबत पुसद उपविभागीय अधिका-यांनी लक्ष द्यावे. प्रत्येक पॉझेटिव्ह रुग्णांच्या मागे किमान २० जणांचा शोध घेऊन चाचणी करा. जिल्ह्याचा पॉझेटिव्हीटी दर कमी करायचा असेल तर पुढील संपूर्ण आठवडा गांभिर्याने काम करा. एका आठवड्यात जिल्ह्याच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी तसेच कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावे, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या. बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ठमके, डॉ. सुभाष ढोले, डॉ. प्रशांत पवार आदी उपस्थित होते.

तीघांचा मृत्यू, ३६५ पॉझेटिव्ह
गेल्या २४ तासात तीन जणांचा मृत्यू झाला असून, ३६५ जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर २३० जणांनी कोरोनावर मात केली आहे. मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ तालुक्यातील ७८ वर्षीय पुरुष, पुसद शहरातील ४१ वर्षीय पुरुष आणि दिग्रस तालुक्यातील ६९ वर्षीय पुरुष आहे. तसेच पॉझेटिव्ह आलेल्या ३६५ जणांमध्ये २१९ पुरुष आणि १४६ महिला आहेत. यात यवतमाळातील ११५, पुसद ८३, आर्णि २८, कळंब २४, बाभूळगाव २२, दारव्हा २०, दिग्रस १७, नेर १६, पांढरकवडा १६, वणी १३, राळेगाव ४, घाटंजी १, महागाव १, उमरखेड १ आणि इतर ठिकाणचे ४ रुग्ण आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!