“कुंकुवाचा धनी गेला अन, त्या माऊलीने संसार उभा केला”

यवतमाळ: दुधाचे ओठ न सुखलेली तन्वी आणि आवेश सोबतच ऐन उमेदीच्या काळात १२ वीचे शिक्षण घेणारा प्रतिक; बापाच्या खांद्यावर खेळण्या बाळगण्याचे वय आणि अशातच वडिलांचा घातपाती जीव गेला तिघेही पोरखे झाले. डोक्यावरचे छत हरविल्याचे पाहून ती माऊली खचली नाही ; वाकली नाही संकटानाच तिने वाकविले. तिच्या नावातच ‘वंदना’ असल्याने की काय नियतीला सुद्धा तिला वंदन करावे लागले. स्वतः खस्ता खात मुलाच्या हाती पुस्तक देऊन तिन्ही मुलांना घडविले आणि एक इंजिनीयर दुसरा बॉडी बिल्डर घडविले, अशा श्रीमती वंदना अनिल साळवे, सध्या कार्यरत प्रमुख लिपिक- पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला तथा कवियत्री/साहित्यिक यांची ही प्रेरणादायी कहाणी.
“अरे संसार संसार, जसा तवा चुलीवर
आधी हाताला चटके, तवा मिळते भाकर”
बहिणाबाई चौधरीची ही कविता काळजाला भिडून जाते.कपाळावरील कुंकुवाला सौभाग्याचं लेन मानलं जाते. मात्र हेच कुंकू पुसल्या गेलं की एकाएकी पडलेल्या स्त्रीला समाजसह सर्वच पायऱ्यांवर लढा द्यावा लागतो, त्यामध्ये वंदना साळवे यांना सुध्दा असंख्य वेदना सहन कराव्या लागल्या आहे. वडिलांच्या जाग्यावर पोलीस विभागात लिपिक म्हणून 1995 मध्ये रुजू झाल्यात आजोबा पासून सगळे पोलीस खात्यात असल्याने खात्याबद्दल नेहमीच आदर होता. प्रेम विवाह असल्याने सासरच्या लोकांनी कधी स्वीकारलेच नाही ;त्यातच पतीचे घातपाती निधन झाले आणि त्याही परिस्थितीत सासरचे लोकांनी कधी जवळ केले नाही; अनपेक्षित वज्रघात व्हावा अशी वेदना वंदनाच्या नखशिखांत पोहचली. कपाळावरचे कुंकू तारुण्यात पुसल्या गेले.धाय मोकलून ती रडली-पडली मात्र तीन गोंडस मुलं बघून तिच्या हृदयात धैर्य जागे झाले. संसाराची सुखद स्वप्ने रंगवितांनाच पती गमावल्याने वंदनासमोर जीवनमरणाचा प्रश्न उभा ठाकला.
आयुष्य जगतांना अनेक समस्यांनी त्यांची ओंजळ दुःखाने भरत रहायची. पती गेल्यानंतर त्या माऊलीची परिस्थिती परीक्षा घेत होती. अशातच नोकरी सांभाळून लहानपणा पासून त्यांना लिखाणाचा छंद होता नोकरीतही हा छंद जोपासला आणि हळू-हळू त्यांनी उत्कृष्ठ लिखानाच्या जोरावर वास्तववादी कविता लिहून संपूर्ण महाराष्ट्रात विद्रोही कवियत्री म्हणून नावलौकिकास आल्यात. २०१४ साली खामगाव येथे कार्यरत असतांना स्त्री भ्रूण हत्यावर आधारित ‘बेटिया’ कविता फार प्रसिद्ध झाली आणि तत्कालिन पोलीस उपविभागीय अधिकारी श्री.जी.श्रीधर यांनी त्याच्या अखत्यारीत पोलीस स्टेशनला दर्शनी भागात लावल्यात. यापुढेही जाऊन चंद्रपूर, यवतमाळ व उस्मानाबाद येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सुद्धा त्या सहभागी होत्या व तिथे सुद्धा त्यांनी आपला ठसा उमटऊन प्रेसक्षकांची भरघोस दाद मिळवली होती.
या सोबतच पोलीस खात्याच भारतातील पहिलं पोलीस साहित्य संमेलन, मुंबई ला आयोजित केल्या गेले होते व त्यामध्ये महाराष्ट्रातून एकमेव लिपिक प्रवर्गातून सहभागी झाल्या होत्या व त्याच्या साहित्यातील कार्यकर्तृत्वाचा गौरव म्हणून श्री दत्ता पडसलगीकर,तत्कालीन पोलीस महासंचालक म.रा. यांच्याकडून नागपूर येथे विशेष सन्मानित सुद्धा केल्या गेलेले आहे. आज राज्यात नोकरी सांभाळून प्रसिद्ध कवियत्री/साहित्यिक असून अनेक प्रभोधनात्मक कार्यक्रमात त्यांना आवर्जून व्याख्यानासाठी बोलवले जाते. या सगळ्यामध्ये मुलाच्या उच्च शिक्षणासाठी बँकेचे ऋण काढून त्यांनी मुलांना घडविले आर्थिक परिस्थिती आड आली तरीही परिस्थितीला न खस्ता एका मुलाला मेकॅनिकल इंजिनीअर तर दुसऱ्याला बॉडी बिल्डर बनविले. यापलीकडे जाऊन पतीच्या मृत्यूनंतर स्त्रीच्या वाट्याला आलेले आयुष्य काळवंडलेले असते हे मळभ हटविण्यासाठी त्या माऊलीचा निकाराचा लढा आजही सुरूच असला तरी नोकरी संभाळून आपल्या लिखानाच्या छंदाला न्याय देऊन राज्यात विद्रोही कवियत्री तथा साहित्यिक म्हणून प्रकाशझोतात आल्यात आणि अशातच कुंकुवाचा धनी गेला अन वंदनाने नेटाने संसार उभा केला, असेच शब्द आज समाजातील प्रत्येकाच्या तोंडून निघत आहे.
लेखक – राहुल इंगोले
दारव्हा जि. यवतमाळ
मोबाईल क्रमांक ९७६७८२४०८७