विदर्भ

प्रा. सतेश्वर मोरे हे रचनात्मक सौंदर्याचे नाव – प्रशांत वंजारे

 


यवतमाळ – साहित्याचे विविध प्रवाह आहेत. आंबेडकरी साहित्य हा धम्मक्रांतीनंतरच्या वैचारिक परिवर्तनाचा प्रवाह आहे. साहित्य आणि धम्मक्रांती यांची सुसंगतता हे आंबेडकरी साहित्याचे वेगळेपण आहे. त्यामुळे आंबेडकरी साहित्याची सैद्धांतिक मांडणी केली पाहिजे असे प्रतिपादन येथील अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संसदेचे अध्यक्ष प्रशांत वंजारे यांनी केले. ते आंबेडकरी चळवळीतील अग्रगामी विचारवंत प्रा. सत्तेश्वर मोरे यांच्या आॅनलाईन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या आदरांजली सभेत बोलत‌ होते. यावेळी प्रा. डॉ. बी‌. आर. वाघमारे, प्रा.डॉ.वामन गवई, प्रा.डॉ.कमलाकर पायस, प्रा.डॉ.रवींद्र मुंद्रे, डॉ. उर्मिला पवार, डॉ. भाष्कर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक विदर्भ मतदारचे संपादक दिलीप एडतकर हे होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर थॉट्स अमरावती विद्यापीठ, शिक्षक विद्यार्थी संघाच्या वतीने नुटाचे सहसचिव, प्रख्यात साहित्यिक, नाटककार स्मृतिशेष प्रा.सतेश्वर मोरे सर यांच्या आदरांजली सभेचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतांना वंजारे म्हणाले की, सत्तेश्वर मोरे हे आंबेडकरी चळवळीतील रचनात्मक सौंदर्याचे अलौकिक नाव होते. त्यांची प्रखर आंबेडकरी निष्ठा वादातीत आणि सर्वमान्य होती. आंबेडकरी चळवळ ही एकखांबी असते हा विचार त्यांनी दिला. कार्यकर्त्याचं अकाली जाणं ही समाजाची मोठी हानी असते. तो समुहाचा नायक असतो. नायकच नसेल तर समुह विखरतो. म्हणून माणसाच्या जगण्या मरण्याची चळवळ विझू द्यायची नसेल तर साहित्य आणि संस्कृतीची चळवळ गतिमान करावी लागेल. कारण कार्यकर्त्याची सामाजिक कृती ही अंतिमतः सांस्कृतिक कृतीच असते असेही ते म्हणाले. प्रा. मोरे यांच्या अकाली जाण्याने आंबेडकरी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीची मोठी हानी झाल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

ओरिसाहून सहभागी झालेले बासुदेव सुनानी म्हणाले की, सत्तेश्वर मोरे हे वस्तूनिष्ठ आंबेडकरी भूमिका जगणारे होते. त्यांचं साहित्य हे लिखित स्वरूपात नसले तरी ते विविध लेख, कविता, वैचारिक भूमिका, प्रस्तावना आदींच्या स्वरुपात विविध ठिकाणी विखुरलेले आहे. ते संकलित करुन पुस्तकांच्या रुपात उपलब्ध झाले पाहिजे. त्यांचा विचार पुढील काळात जगला पाहिजे. तसेच आपण मोरे यांचा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवायला हवा. पुण्याहून सहभागी झालेले अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे अध्यक्ष अशोक बुरबुरे यांनी अनेक आठवणी सांगताना त्यांना गहिवरुन आले होते . डॉ. उर्मिला पवार म्हणाल्या की, मोरे यांचे व्यक्तिमत्त्व विचारांशी बांधिलकी जोपासणारे होते. आपलं एक साहित्य कुटुंब असावं तसेच याच कुटुंबातून स्रिया पुढे आल्या पाहिजेत, त्या बोलल्या पाहिजेत, त्यांनी आपलं मन मोकळं केलं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. आदरांजली सभेचे सूत्रसंचालन संदिप राऊत यांनी केले.‌ यात प्रशांत रोकडे ( IRS दिल्ली), रमेश कटके, सुनंदा बोदिले(अमरावती), अशोक देशभ्रतार (नागपूर) यांनीही सहभाग नोंदवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!