महाराष्ट्रराजकीय

हे सरकार व्याभिचार्‍यांच्या मागे उभे राहणार का ? -आमदार मदन येरावार

 

यवतमाळ – अखेर 21 दिवसांनंतर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा आला असला तरी तेवढ्याने प्रश्न संपणार नाहीत. इतक्या दिवसांमध्ये पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी साधा एफआयआरही दाखल करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. एका तरुण मुलीचा जीव गेल्याच्या गंभीर प्रकरणातही महाराष्ट्र सरकार व्याभिचारी लोकांच्या मागे उभे राहणार काय, असा प्रश्न आमदार मदन येरावार यांनी उपस्थित केला आहे.

यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या रविवार, 28 फेब्रुवारी रोजी आलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर आ. येरावार बोलत होते. ते म्हणाले, पूजा चव्हाण या ग्रामीण भागातून आपले भविष्य घडविण्यासाठी पुण्याला आलेल्या गरीब मुलीला आपला जीव गमवावा लागला, ही घटनाच गंभीर आहे. तिची हत्या की आत्महत्या हे तपासाअंती सिद्ध होईल. परंतु यात एफआयआरच दाखल न होण्याने हे सरकार महिलांना न्याय मिळवून देणार की नाही, असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे.

या प्रकरणात खूपसार्‍या ‘ऑडिओ क्लिप्स’ उपलब्ध झाल्या आहेत. या सर्व या प्रकरणात गुंतलेल्याच लोकांनी उलपब्ध करून दिल्या आहेत. त्यातील एक आवाज हा संजय राठोड यांचाच आहे, हे यवतमाळ जिल्ह्यातील कोणीही सांगेल. हे संभाषण अनेक दृष्टींनी संशय निर्माण करणारे आहे. या संदर्भात ‘कर नाही तर डर कशाला’ अशी स्पष्ट भूमिका घेण्याऐवजी संजय राठोड यांनी बेपत्ता होणे पसंत केले, ही गंभीर बाब आहे, असे सांगून मदन येरावार यांनी, हे सरकार कोणाला पाठीशी घालत आहे, असा प्रश्न विचारला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!