क्रीडा व मनोरंजनग्रामीणविदर्भ

रंगो बापूजी गुप्ते ऐतिहासिक स्मृतीस्थळ दुर्लक्षीत

हरिष जाधव / दारव्हा

महाराष्ट्रातील नैसर्गिक, ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन करण्यासाठी पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करण्याचे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे. दारव्हा येथील ऐतिहासिक रंगो बापुजी गुप्ते स्मृतीस्थळाचा त्यात समावेश आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ह्या स्थळाचे विकासाकरिता रु.२५ लक्ष निधी देखील काही वर्षांपुर्वी मंजूर करण्यात आलेला होता.परंतु सदर स्थळाची जागा खाजगी मालकी क्षेत्रात असल्यामुळे निधी परत करण्यात आला. त्यानंतर प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे हे स्थळ दुर्लक्षित आहे.
दारव्हा-दिग्रस राज्यमार्गाच्या डाव्या बाजुस लाभसेटवार यांचे शेतात ऐतिहासिक वारसा असलेले स्थळ नैसर्गिक दृष्ट्या देखील नयनरम्य आहे.या स्थळाभोवती गीरकी घेत नदी वाहते आहे. डेरेदार ऊंच चिंचेच्या झाडांच्या सावलीने परीसरात नैसर्गिक शांतता निर्माण केलेली आहे. त्यामुळे अनेक नवनवीन पक्षी ह्या परीसरात भ्रमण करीत असतात. चीवचीव, किलकिलाट,विवीध त-हेच्या मनमोहक मधूर आवाजाने ह्या परीसराचे सौंदर्य वाढले आहे.ह्या नदिवर आकर्षक कोल्हापुरी बंधारा आहे. ब्रिटीशकालीन रेल्वेच्या पुलाचे चौरस दगडात बांधलेले बांधकामाची गुणवत्ता दर्शविणारे पीअर्स अ‍ॅबुटमेंट आहेत. दारव्हा शहरापासुन अवघ्या २ किमी अंतरावर रंगो बापुजी गुप्ते स्मृतीस्थळ आहे. रंगो बापूजी गुप्ते हे मोठे मुत्सद्दी राजकारणी, स्वतंत्रता सेनांनी, आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारी चळवळीचे खंदे कार्यकर्ते होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे अखेरचे वारस साता-याचे राजे छत्रपती प्रतापसिंह १८०८ साली गादीवर आले. त्यांना गादीवरून घालवण्या साठी इंग्रजांनी त्यांच्या विरुद्ध अल्प संतुष्ट लोकांसह कट-कारस्थान करायला सुरुवात केली. त्याचं वेळी ‘रंगो बापूजी’यांची वडिलोपार्जित वतन वापस मिळवायची धडपड चालू होती. पण धन्याचे हाल बघून रंगो बापूजी राजांसाठी साहसी कामे करू लागले. राजांकडे गोपनीय पत्रव्यवहार पोहोचवणे आणि त्यांच्या कडून कामाची कागदपत्रे विश्वासू माणसांना सोपवणे. अशा कामापासून त्यांनी सुरुवात केली. ब्रिटिशांनी सातारा संस्थान १८३९ मध्ये बरखास्त केले. राजांनी ब्रिटिश संसदे समोर त्यांची बाजू मांडण्यासाठी इंग्लंड मध्ये दोन वकिलांची नियुक्ती केली होती. पण वकिलांच्या शिष्टाईचे दोन्ही प्रयत्न फसले. त्यामुळे राजांनी ‘रंगो बापूजी’ यांना इंग्लंडला पाठवले. ‘रंगो बापूजी’ यांना इंग्लंडमध्ये राहण्यासाठी जागा, खाण्यासाठी पैसे आणि जगण्यासाठी काहीही साधन नव्हते. तरी आंग्ल भाषा त्यांनी इंग्रज मित्रा कडून शिकून घेतली. इंग्लंड च्या रस्त्या रस्त्यावर त्यांनी मराठी राजाच्या अन्याया विरुद्ध रणशिंग फुंकले. रस्त्यावर तेथील लोकांना गोळा करीत, भाषणे देऊन आवाज उठवत असत. रंगो बापूजी यांचा धडाडीपणा, चतुरस्त्र पणा बघून तेथील काही ब्रिटिश खासदार आणि अधिकारी त्यांचे मित्र बनले. सतत १४ वर्ष तिथे राहून छत्रपतींची वकिली करत असताना त्यांनी अनेक भाषणे दिली. पुस्तके छापली आणि पत्रव्यवहार केला. त्यांनी संभाषण चातुर्य, लेखन, वक्तृत्व कौशल्य, हुशारीच्या जोरावर इंग्रज अधिका-याचे अनेक डावपेच उधळले. शेवटी १४ वर्ष वकीली केल्यानंतर ते भारतात परत आले.

 

इंग्रज राजवट उलथवुन टाकण्याचा प्रयत्न

भारतीय क्रांतिकारकांनी रंगो बापूजी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी इंग्रज राजवट उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला. तिकडून इंग्रजाची नजर चुकवून रंगो बापूजी धूर्तपणे उत्तर भारतात गेले. तिथे त्यांनी तात्या टोपे आणि नानासाहेब पेशवे यांची भेट घेतली. त्यानंतर सातारा भागात १८५७ च्या उठावाची गुप्त तयारी सुरू केली. सैनिकांच्या सशस्त्र तुकड्या तयार केल्या. छत्रपतींविषयी आदर असर्णाया अठरापगड जातींमधील शेकडो लोकांना त्यांनी इंग्रजांविरूद्ध लढण्यासाठी संघटित केले. भेरचे पंतसचिव चिमणाजी रघुनाथ ह्यांच्या मदतीने त्यांनी सैन्यभरती सुरू केली. त्यात मंगल पांडे यांना फाशी झाली. तसेच इंग्रजांच्या हेरांनी पलटणींमध्ये बेदिली माजवण्यास सुरुवात केली. रंगो बापुजी यांच्या लढ्याला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यात फंदफितुरीने त्यांचे अनेक सैनिक मारले गेल्यानंतर रंगोबा,तात्या टोपे आणि नानासाहेब पेशवे भूमिगत झाले. त्यानंतर रंगोबा ठाणे येथे नातेवाईकाकडे पुतण्याच्या लग्नकायार्साठी गेले असताना त्यांना ब्रिटिश पोलीस अटक करण्यासाठी पोहोचले. त्यांना समजताच वेशांतर करून रंगो बापूजी तेथून पसार झाले. त्यानंतर रंगो बापुजी गुप्ते व त्यांचे मीत्र पकडल्या जाण्याचे भितीने साधु बैरागी बनून विविध भागात वास्तव्य करून राहिले.

 

 

कुपटी नदीच्या काठावर वास्तव्य

सन १८७० मध्ये दारव्हा येथे रंगो बापुजी गुप्ते कुपटी नदीच्या काठावर बैरागी बाबा या नावाने रहायला लागले व स्वातंत्र्यासाठी गुप्त कारवाया करत होते. १८८५ मध्ये दारव्हा येथेच आपल्या मठात त्यांनी देह ठेवला. रंगो बापूजी यांच्या कायार्चे स्मरण म्हणून सातारा येथे ‘चार भिती’ हे स्मारक निर्माण करण्यात आले आहे. दारव्हा येथील हे ऐतिहासिक समाधीस्थळ आहे.

 

मुख्यमंत्र्यांना निवेदन
दारव्हा येथील ऐतिहासिक स्मृती स्थळाच्या विकासाकडे दुर्लक्ष आहे. ह्या स्थळाचा विकास करण्यासाठी छत्रपती जाधव स्वा. सं. सै. स्मृतीप्रतिष्ठान तर्फे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!