कु-हाडीने वार करून पत्नीची हत्या

झरी : कुटुंब नियोजन शस्त्रक्रीयेच्या कारणावरून वाद निर्माण झाल्याने पतीने कु-हाडीने सपासप वार करून पत्नीची हत्या केली. मुकुटबन पोलिस स्टेशन अंतर्गत येणा-या जुणोनी येथे काल मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली.
रिया उर्फ सरस्वती सिद्धार्थ फुसाटे (३०) रा. जुणोनी असे मृतक महिलेचे नाव आहे. सिद्धार्थ बिरबल फुसाटे (३५) रा.जुणोनी असे आरोपीचे नाव आहे. ९ फेब्रुवारी रोजी कुटुंब नियोजन शस्त्रक्रीया करण्याच्या कारणावरून त्या दोघांमध्ये वाद झाला. सिद्धार्थ फुसाटे याने पत्नी रियाच्या डोक्यावर कु-हाडीने सपासप वार केले. त्यामुळे रिया रक्ताच्या थारोळ्यात खाली निपचित पडून जागीच मृत्यू झाला. रियाला दोन मुली असुन एक अडीच वर्षाची तर दुसरी ४ महिण्याची असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुकुटबन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी इंदिरा रमेश टेकाम रा. जुणोनी यांच्या तक्रारीवरून मुकुटबन पोलिसांनी आरोपी विरुद्ध भादंवी कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, आरोपी पती सिद्धार्थ फुसाटे याला अटक केली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार धर्मा सोनोने करीत आहे.