स्वाभिमान संघटनेच्या मागणीने, जिल्ह्यात कामगार अधिकारी नियुक्त

नवनियुक्त कामगार अधिकाऱ्यांचे निरज वाघमारे यांच्या हस्ते स्वागत
यवतमाळ : जिल्ह्यातील कामगार अधिकारी कार्यालयाचा कारभार गेल्या अनेक वर्षांपासून प्रभारावर असल्याने जिल्ह्याला कायम स्वरूपी कामगार अधिकारी मिळावा यासाठी स्वाभिमान कामगार संघटनेचे निरज वाघमारे यांनी अमरावती उपायुक्त यांच्याशी पत्रव्यवहार करून ही मागणी केली होती. याच मागणीची दखल घेऊन आज कामगार विभाग मार्फत यवतमाळ जिल्हा कार्यालयात कायमस्वरूपी कामगार अधिकारी नियुक्त करण्यात आला.
यवतमाळ जिल्हा हा विदर्भातील एक मोठा जिल्हा असून जिल्ह्यात कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे . त्या अनुषंगाने जिल्ह्यातील कामगारांच्या न्यायहक्क व अडीअडचणी समस्या सोडविण्यासाठी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे . मात्र जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयातील सरकारी कामगार अधिकारीच हजर नसल्याने या कार्यालयावर कोणाचेही नियंत्रण व वचक राहत नाही. जिल्ह्यातील सरकारी कामगार अधिकाऱ्यांचे पदभार सद्यस्थितीत अमरावती येथील कामगार अधिकाऱ्यांवर होता, हे अधिकारी आपल्या फुरसतीने आठवड्यातुन एखाद्या वेळेस या कार्यालयात दाखल होत होते. यामुळे कामगारांचे अनेक प्रश्ने प्रलंबित राहत होते. त्यामुळे जिल्ह्याला कायमस्वरूपी अधिकारी देण्यात यावा याकरिता काही दिवसांपूर्वी स्वाभिमान कामगार संघटनेचे अध्यक्ष निरज वाघमारे यांनी अमरावती येथील उपायुक्त यांना निवेदन देऊन ही मागणी केली होती. याच मागणीची दखल घेत वरिष्ठ कार्यालयांनी जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयाचा कारभार चांगदेव काशीद यांच्या कडे देण्यात आला.
नवनियुक्त कामगार अधिकारी चांगदेव काशीद यांनी आज कार्यालयाचा कारभार स्विकारताच स्वाभिमान कामगार संघटनेचे अध्यक्ष निरज वाघमारे व सहकाऱ्यांनी त्यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, यावेळी स्वाभिमान कामगार संघटनेचे वसीम पठाण, रोशन मस्के, सुरज मेश्राम, जित उमरे, तौफिक खान, तौफिक पठाण, हृषीकेश सावळे, वैभव धामनवार, प्रणव राठोड, सनी ढाकरगे, महेश वाघमारे, ओम चंद्रवंशी, साहिल खान, रशीद शेख, अरमान खान, यश किर्दक, देवानंद पंधरे,गोलू शेख, सोहेल खान, सनी ढाकरगे, रोहन ढोले यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.