विदर्भ

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव धुमधडाक्यात साजरा होणार !

 

यवतमाळ : कोरोना काळात स्थगित करण्यात आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचा कार्यक्रम धुमधडाक्यात साजरा करण्याचा निर्णय जयंती उत्सव मंडळाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. सम्राट अशोका बुद्धविहार, पाटीपुरा येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष आनंद गायकवाड हे होते.
दि. १२ एप्रिल ते २५ एप्रिल २०२१ पर्यंत तब्बल १४ दिवस हा उत्सव विविध स्पर्धा, प्रबोधन व संगीतमय कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात येणार आहे.
या उत्सवात निबंध, चित्रकला, संविधान स्लोगन, समूह नृत्य, एकल नृत्य, एकपात्री प्रयोग, गृह सजावट, रांगोळी, स्लो सायकल, कॅरम, बुद्धीबळ इत्यादी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मॅरेथॉन दौड सुद्धा होणार आहे. प्रत्येक स्पर्धेत विजेत्यांना नगद राशी व स्मृतिचिन्ह आणि सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
प्रबोधनात्मक कार्यक्रमांतर्गत भदन्त महाथेरो ज्ञानज्योती यांची धम्मदेसना, व्याख्यान, परिचर्चा तथा कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध गायक अनिल खोब्रागडे, नागपूर यांचे सुगम संगीत, गायक तथा कव्वाल नागसेन सावदेकर औरंगाबाद, आकांक्षा नगरकर आणि संच ,नागपूर यांचा आॅर्केस्ट्रा इत्यादींच्या तारखा निश्चित झाल्या असून गायक तथा संगीतकार अनिरुद्ध वनकर, जलसाकार संभाजी भगत व प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मराठी चित्रपट अभिनेत्री सांची जीवने यांची मी “रमाबाई आंबेडकर” बोलते ही एकपात्री नाटिका सादर होणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले असून अत्यंत उत्साहाने जयंती मंडळाचे पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत. बैठकीत जयंती मंडळाचे पदाधिकारी नवनीत महाजन, रवि धाकडे, सागर कळणे, निलेश सोनटक्के, रवि वासनिक, रविता भोवते, वंदना उरकुडे, प्रमोद पाटील, विजय शेंडे, शंकर भस्मे, महावीर खोब्रागडे, राहूल वाणी, राहुल शेंडे इत्यादी हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!