संपादकीय व लेख

कोरोना: आरोग्य विभागाच्या मंजुषा येडांगे यांना दिली पहिली लस

 

 

लस आली तरी कोरोनाबाबत जागृत राहणे गरजेचे – पालकमंत्री राठोड

दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणाचा शुभारंभ

 

यवतमाळ : जिल्ह्यात कोव्हीडची लस नुकतीच प्राप्त झाली आहे. आजपासून लसिकरण मोहिमेची अंमलबजावणी करण्यात आली. दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. आरोग्य कर्मचारी मंजूषा येडांगे ह्या कोव्हीडची लस घेणा-या जिल्ह्यातील पहिल्या लाभार्थी ठरल्या आहेत. त्यांनी पालकमंत्री आणि अधिका-यांच्या उपस्थितीत लसीकरण कक्षात लस घेतली. त्यांच्यानंतर अनिल गोकूळे, राजेश चव्हाण, शरदचंद्र पवार, संतोष कोरडे या आरोग्य कर्मचा-यांनीसुध्दा लस घेतली.

पालकमंत्री तथा वनमंत्री संजय राठोड म्हणाले की, गत संपूर्ण वर्ष हे कोरोनाच्या सावटाखाली गेले. यावर्षीच्या सुरवातीलाच कोव्हीड लस उपलब्ध झाल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे. मात्र असे असले तरी कोरोनाचा धोका टळला नाही. याबाबत अजूनही नागरिकांनी जागृत राहून शासन आणि प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन केले.

यावेळी जि.प. अध्यक्षा कालिंदा पवार, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, दारव्हाचे नगराध्यक्ष बबनराव इरपे, पं.सं. सभापती सुनिता राऊत, उपसभापती नामदेव जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते.
जिल्ह्याला 18500 लसींचा पुरवठा करण्यात आला असून आज दारव्हासह पांढरकवडा आणि पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात तसेच उमरखेड आणि वणी येथील ग्रामीण रुग्णालयात ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. लसीकरणासाठी शासनाने को-वीन हे सॉफ्टवेअर निर्माण केले असून यात नोंदणी केल्यावर लाभार्थ्यांना एसएमएस प्राप्त होतो. लसीचा पहिला डोज घेतल्यानंतर 28 दिवसानंतर दुसरा घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात शासकीय व खाजगी आरोग्य कर्मचारी, दुस-या टप्प्यात फ्रंटलाईन विभागाचे कर्मचारी, तिस-या टप्प्यात 50 वर्षांपेक्षा अधिक वय असणारे नागरिक आणि चवथ्या टप्प्यात उर्वरीत सामान्य नागरिकांना लसीकरण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, 2020 मध्ये कोरोना हावी होता. मात्र नवीन वर्षाची सुरवातच नागरिकांना दिलासा देणा-या लसीपासून झाली आहे. जिल्ह्यात पाच ठिकाणी 500 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. नागरिकांना अजूनही मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले, लसीकरणाच्या माध्यमातून कोरोनाच्या शेवटाची सुरूवात झाली आहे. नागरिकांनी लसीकरणाला घाबरण्याची गरज नाही. तर कोरोनाच्या काळात संपूर्ण यंत्रणा जीवावर उदार होऊन काम होती. आरोग्य विभागाने नागरिकांच्या वेदना कमी करण्याचे काम केले आहे. लसीकरणाच्या माध्यमातून एक चांगली सुरूवात झाल्याचे पोलिस अधिक्षक भुजबळ यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते कोरोनायोध्दांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांनी लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेण्यासाठी प्रत्येक कक्षाला भेट दिली. यात लसीकरण प्रतिक्षा कक्ष, प्रत्यक्ष लसीकरण कक्ष, को-व्हीन ॲप, लसीकरणानंतर निरीक्षण कक्षांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्तावित जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी केले. संचालन डॉ. नितीन भेंडे यांनी तर आभार मंगेश वड्डेवार यांनी मानले. यावेळी दारव्हाचे उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, उपविभागीय पोलिस अधिकारी उदयसिंह चंदेल, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अभय मांगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खांदवे, डॉ. सुभाष ढोले, डॉ. पी.एस.चव्हाण, डॉ. प्रशांत पवार, माजी सभापती उषा चव्हाण, पं.स. सदस्य सिंधू राठोड यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!