ब्रेकिंगविदर्भ

यवतमाळात कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापण्याच्या हालचाली तीव्र

 

वनमंत्री संजय राठोड यांचा पुढाकार, कृषीमंत्र्यांकडे शिफारस

यवतमाळ – डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत यवतमाळ येथे स्थापन झालेल्या शासकीय अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयासोबतच कृषी अभियांत्रिकी पदवी महाविद्यालय सुरू करण्यासाठी राज्य शासनाकडे २०१८ मध्येच शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापण्यास संबंधित विभागांना निर्देश देण्याची शिफारस राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी कृषीमंत्री दादाजी भूसे यांच्याकडे केली आहे.

कृषी तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ येथे सुरू करण्यासंदर्भात वनमंत्री संजय राठोड यांनी पुढाकर घेतल्यामुळे हे महाविद्यालय स्थापन करण्यासाठी शासनस्तरावर हालचाली तीव्र झाल्या आहेत. सद्यस्थितीत विदर्भात अकोला येथे एकमेव शासकीय कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. शेतीच्या वाढत्या आधुनिकीकरणामुळे कृषी अभियांत्रिकी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा असून या शिक्षणाची गरजही आहे. त्यामुळे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत यवतमाळ येथे कृषी अभियांत्रिकी पदवी महाविद्यालय स्थापन करण्याबाबत कार्यवाही करण्याची शिफारस ना. राठोड यांनी कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे. यवतमाळ येथे प्रतिवर्ष ४० विद्यार्थी क्षमता असलेले अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय स्थापन करण्यात आले आहे. हे महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरूही झाले. या महाविद्यालयाच्या निर्मितीच्या वेळी २०१८ मध्येच यवतमाळ येथे कृषी अभियांत्रिकी पदवी महाविद्यालय स्थापन करण्याबाबत शासनाकडे शिफारस करण्यात आली होती. या शिफारशीच्या अनुषंगाने कृषी अभियांत्रिकी पदवी महाविद्यालय सुरू करण्यासाठी संबंधित विभागांना दिशानिर्देश देण्यात यावे असे ना. संजय राठोड यांनी कृषीमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

यवतमाळ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शिफारशीनुसार कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाल्यास येथील शेतकरीपूत्रांना नवीन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करून शेती आणि शेतकऱ्यांना अधिक समृद्ध करण्याची संधी मिळेल. सोबतच जिल्ह्यातील शेतकरी या महाविद्यालयाच्या मदतीने शेतात विविध प्रयोग करू शकतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!