ब्रेकिंगसंपादकीय व लेख

‘बर्ड फ्ल्यू’ बाबत यंत्रणा अलर्ट

 

यवतमाळ, : जिल्ह्यात अद्याप ‘बर्ड फ्ल्यू’ चे निदान व्हायचे असले तरी मृत झालेल्या पक्षांचे नमुने तपासणीकरीता भोपाळला पाठविण्यात आले आहे. केळापूर तालुक्यात लिंगटी शिवारात मृत आढळलेल्या पक्षांचा संसर्ग इतर ठिकाणी पसरू नये म्हणून यंत्रणांना दक्ष राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले.
देशात व राज्यात आढळलेल्या ‘बर्ड फ्ल्यू’ संसर्गाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिका-यांनी आज (दि. 13) आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, पशुसंवर्धन विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. क्रांती काटोले, उपायुक्त डॉ. बी. आर. रामटेके, डॉ. नागापुरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आर. डब्ल्यू. खेरडे, आदी उपस्थित होते.
केळापूर तालुक्यात लिंगटी शिवारात पक्षांचा मृत्यु झाल्याने हा संसर्ग इतर ठिकाणी पसरू नये म्हणून, पशुसंवर्धन विभागाने परिस्थितीवर गांभिर्याने लक्ष द्यावे, असे सांगून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह म्हणाले, निरोगी पक्षाचे चिकन खाण्यास कोणतेही निर्बंध नाही. मात्र घरी आणलेले चिकन संपूर्णपणे उकळून (बॉईल) घ्यावे. तसेच स्वच्छ केल्यानंतर हात सॅनिटाईज करावे. कुठेही पक्षाचा मृत्यु आढळून आल्यास नागरिकांनी त्या मृत पक्षाला थेट हाताचा संपर्क करू नये. याबाबत पशुसंवर्धन विभागाशी त्वरीत संपर्क करावा. मृत आढळलेल्या पक्षाच्या केंद्रातून इतर कोणताही पक्षी बाहेर जाता कामा नये. उपविभागीय अधिका-यांनी पशुसंवर्धन विभागाच्या संपर्कात राहून पक्षांची आवागमन करण्यास निर्बंध घालावे. पांढरकवडा परिसरात हा प्रकार आढळून आल्यामुळे संबंधित उपविभागीय अधिका-यांनी सर्व यंत्रणेला अलर्ट करून योग्य काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
यावेळी पशुसवंर्धन उपायुक्त डॉ. रामटेके यांनी सादरीकरण केले. केळापूर तालुक्यात लिंगटी परिसरातील कुक्कुटपालन केंद्रात 286 पक्षांचा संशयित मृत्यु झाला असून आर्णि तालुक्यात आठ मोर, दारव्हा तालुक्यात चार वराह, घाटंजी परिसरात चार कावळे आणि यवतमाळातील दोन कावळ्यांचा मृत्यु झाल्याची माहिती त्यांनी दिली.

 

10 किमी परिसरात प्रतिबंध आदेश

केळापूर तालुक्यातील लिंगटी शिवारात कुक्कुटपालन केंद्रातील पक्षांचा मृत्यु झाल्यामुळे अज्ञात रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लिंगटी गाव शिवारातील कुक्कुट पक्षी गृहापासून 10 किमी त्रिज्येतील परिसरात कुक्कुट पक्षांची खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा / प्रदर्शन आयोजित करण्यास जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी प्रतिबंध केला आहे. तसेच लिंगटी हे गाव अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आले असून पुढील आदेशापर्यंत गावातील आवागमन प्रतिबंधित करण्यात आल्याचे आदेशात नमुद आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!