नवजात केयर युनिटला आग; दहा बालकांचा मृत्यू

मुंबई : विदर्भातील भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात केयर युनिटला आग लागुन दहा नवजात बालकांचा गुदमरुन मृत्यू झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.
भंडारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील नवजात केअर युनिटमध्ये १७ बालकांना ठेवण्यात आले होते. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान शनिवारी रात्रीच्या दोन वाजताच्या सुमारास अचानक नवजात केअर युनिटमधून धुर निघत असल्याचे ड्युटीवर असलेल्या नर्सच्या लक्षात आले. त्यांनी आत बहितले असता युनिटमध्ये सर्वत्र धुर पसरल्याचे निदर्शनास आले. या बाबतची माहिती रुग्णालय प्रशासनाला दिली. या घटनेची माहिती मिळताच रुग्णालयातील कर्मचा-यांनी शिताफीने अतिदक्षता विभागातील बाळांना बाहेर काढले. यावेळी आई-वडीलांसह नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. या घटनेची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या घटनेची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालय प्रशासनाकडून माहिती घेतली आहे. या घटनेची माहिती मिळताच भंडा-यांचे जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, आरोग्य विभागाचे उपसंचालक संजय जयस्वाल यांनी रुग्णालयात भेट दिली. या घटनेने रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पंतप्रधानांनी व्यक्त केली चिंता
भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत दहा बालकांचा दुर्देवी मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. नवजात बाळांना आपला जीव गमावला असून, ही घटना मन हेलावून टाकणारी आहे. त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त केली असून, जखमी बालक लवकर बरे व्हावेत अशी भावना व्यक्त केली.