
यवतमाळ : राज्यात गुटखा निर्मिती व विक्रीवर निर्बध घातले असतांना अवैध रित्या सुगंधीत सुपारी व तंबाखुजन्य पदार्थासह गुटखा विक्री होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. वणी शहरालगत चिखलगाव येथे बनावट सुगंधीत सुपारी व तंबाखुच्या कारखान्यावर धाड टाकली. ही कारवाई वणी पोलिसांनी केली असून, त्या ठिकाणावरून पाच लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाई गुटखा विक्रेत्याचे धाबे दणाणले आहे.
नागपूर येथील सुपारी कंपनीच्या अधिका-याने त्याच्या कंपनीच्या नावावर बनावट पॅकिंग तयार होत असल्याची तक्रार वणी पोलिसांकडे दिली होती. या बाबतची माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी खबरी नेटवर्क कामाला लावले होते. दरम्यान चिखलगाव येथील महादेव नगरातील अलिशान घरात बनावट तंबाखु व सुगंधीत सुपारी तयार करण्याचा कारखाना असल्याची माहिती समोर आली. त्या आधारे वणी पोलिसांनी चिखलगाव येथील दिपक चावला यांच्या बगल्यावर धाड टाकली. बंगल्याच्या दुस-या माळ्यावरील खोलीत बनावट व प्रतिबंधीत जर्दा, सुपारी तयार करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी घटनास्थळावरुन पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध अन्न व औषध मानके अधिनियमा अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. तसेच शासनाची फसवणुक व कर चोरी केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल केला. ही कारवाई वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार, वणीचे ठाणेदार वैभव जाधव, डी. बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, सधीर पांडे, सुनील खंडागळे, सुदर्शन वानोळे, रत्नपाल मोहोड, पंकज उंबरककर,अमित पोयाम, दिपक वांडर्सकर यांनी केली.