एक लाखाची लाच स्विकारणा-या पिएसआयला अटक

यवतमाळ : फटाक्याच्या दुकानात पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची रेड थांबविण्यासाठी पिएसआयला एक लाख रुपयाची लाच घेतांना रंगेहात पकडले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज सोमवारी घाटंजी पोलीस ठाण्याण्यात ही कारवाई केली. या घटनेने पोलीस दलाची नाचक्की झाली आहे.
राजाभाऊ त्रंबकराव घोगरे असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून, घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. तक्रारदार हा धर्मशाळा वार्ड,घाटंजी येथील रहिवासी आहे. तक्रारदार यांचा फटाक्याच्या व्यवसाय असून त्यांचेवर पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांच्या विशेष पथकाची रेड थांबविण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक घोगरे यांनी सहा लाख रुपयांची मागणी केली होती. या बाबतची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. पडताळणी दरम्यान घोगरे यांनी तक्रारदार यांना तडजोडीअंती एक लक्ष रुपये लाच रक्कम पोलीस अधीक्षक यांच्या स्कॉडसाठी मागणी करून स्वत: स्वीकारण्याचे मान्य केले होते. आज ४ जानेवारी रोजी घोगरे यांना पोलिस स्टेशन घाटंजी येथे १ लाख रुपये घेतांना रंगेहात पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड,पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन, पोलीस उपअधिक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपूरे, पोलीस निरीक्षक गजेंद्र क्षीरसागर, सचीन भोयर, गेडाम, वसीम शेख यांनी केली.