वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली ११ लाखाने फसवणूक

यवतमाळ : प्रतिनिधी
बेंगलोर येथील मेडीकल कॉलेज मध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली एका विद्यार्थ्याकडून ११ लाख ३५ हजार रुपयाने फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला. वसंतनगर (पुसद) पोलिसांनी कर्नाटकच्या डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दिलीप सुधाकर राजे रा. तिरुपती पार्क श्रीरामपूर पुसद असे फिर्यादीचे नाव आहे. फिर्यादी राजे यांच्या मुलाचा वैद्यकीय प्रवेश मेडीकल कॉलेज बेंगलोर येथे करून देतो अशी बतावणी डॉ. शैलेंद्र जोशी रा. कर्नाटक यानी केली. साडेचार वर्षाचे डोनेशन म्हणून व वैद्यकीय प्रवेशा करीता ११ लाख ३५ हजार रुपयाची मागणी केली. सदर रक्कम जोशी यानी दिेलेल्या अकाउंट नंबर ट्रान्सफर केले. त्यानंतर जोशी याच्या सोबत संपर्क केला असता मोबाईल बंद असून, तो नंबर शैलेश जाशी याचा नसल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच दिलीप राजे यांनी पुसद येथील वसंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.