क्राईम न्यूजब्रेकिंग

साकीनाका बलात्कार- हत्या प्रकरण

आरोपी मोहन चौहान याला दिंडोशी सत्र न्यायालयाने ठोठावली फाशी

मुंबई – दिल्लीतील निर्भया अत्याचार प्रकरणानंतर मुंबईतील साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली. या गुन्ह्यातील आरोपी मोहन चौहान याला फाशीची शिक्षा व 30 हजारांचा दंड ठोठावण्यात आली आहे. सदर निकाल दिंडोशी सत्र न्यायालयाने गुरुवारी दिला. न्यायालयाने आरोपी मोहन चौहानवर कुठल्याही प्रकारे दया-माया न दाखवता फाशीची शिक्षा सुनावल्यामुळे पीडितेला खर्‍या अर्थाने न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

नेमके काय घडलं होतं साकीनाक्यात? | Sakinaka rape case

ऐन गणेशोत्सवात मुंबईतील साकीनाका परिसरात 10 सप्टेंबर 2021 च्या मध्यरात्री 32 वर्षीय महिला रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली. तिला तात्काळ घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान महिलेवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही 11 सप्टेंबर रोजी महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर काही तासांत मुंबई पोलिसांनी आरोपी मोहन चौहान याला तुरुंगात धाडले. या प्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात (गु. र. क्र. 937/2021) भादंवि कलम 302, 376(अ),376(2)(एम) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सह अ‍ॅट्रॉसिटी कायदा कलम 3(1)(डब्ल्यू) नुसार मोहन चौहान याच्याविरुद्ध बलात्कार, हत्या, अ‍ॅट्रॉसिटी, जाणीवपूर्वक गंभीर मारहाणसह हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

अवघ्या 18 दिवसांत चार्टशिटी दाखल | Filed chartsheet in just 18 days

या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पोलीस पथक नेमण्यात आले. या पथकाचे नेतृत्व सहाय्यक पोलीस आयुक्‍त जोत्सना रासम यांच्याकडे देण्यात आले. त्यांनी पोलीस पथकसह उत्तमरित्या या गुन्ह्याचा तपास केला. अवघ्या 18 दिवसात आरोपीविरोधात 346 पानांचे चार्टशिट दिंडोशी सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. या गुन्ह्याचा वर्षभरात निकाल लावण्यात आला आहे.

जदलगती न्यायालयातील खटल्याचे सर्वच स्तरातून स्वागत

महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यामुळे मुंबईसह राज्यात एकच खळबळ उडाली. राज्य सरकारने सदर गुन्ह्याचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे जाहीर केले. त्यानुसार दिंडोशी सत्र न्यायालयात खटला सुरू झाला. या खटल्यात विशेष सरकारी वकील राजा ठाकरे आणि अ‍ॅड महेश मुळे यांनी बाजू मांडली. पीडित महिला ही आरोपीला आधीपासूनच ओळख होती. गुन्हा घडण्याच्या 25 दिवसांपूर्वी आरोपीने महिलेला भेटण्याचा आणि संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचा प्रयत्न असफल ठरला होता. दरम्यान, अनेक दिवसांनंतर महिला त्याला भेटली. त्यामुळे रागाच्या भरात चौहान याने तिच्यासोबत अमानुष कृत्य केले. यात लोखंडी सळीचाही आरोपीने वापर केल्याने हे कृत्य पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या गुन्ह्यात मुंबई पोलिसांनी 18 दिवसात चार्टशिट दाखल करून आरोपीला शिक्षा मिळण्यासाठी सबळ पुरावे सादर केले. सर्व पुरावे ग्राह्य धरून आरोपी चौहान याला फाशी सुनावाण्यात आली. जलदगती न्यायालयाच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात आले.

या कलमांन्वये सुनावली शिक्षा…

ही घटना घडल्यानंतर तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्‍त ज्योत्सना रासम यांनी पोलीस पथकासह तपास सुरू केला. अवघ्या 18 दिवसात पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपी मोहन चौहान याच्याविरोधात भक्‍कम वैद्यकीय, भौतिक आणि रासायनिक पुरावयांसह 37 जणांचे जबाब नोंदवले. सदर पुरावे व साक्ष ग्राह्य मानून आरोपी चौहान याला भादंवि कलम 302 नुसार मरेपर्यंत फाशी व 10 हजारांचा दंड, 376(अ) नुसार मरेपर्यंत फाशी, 376(2)(एम) नुसार आजन्म कारावास, महाराष्ट्र पोलीस कायदा कलमनुसार 6 महिने शिक्षा व 2 हजारांचा दंड, दंड न भरल्यास दोन महिने अधिक कारावास, अ‍ॅट्रॉसिटी कायदा कलम 3(1)(डब्ल्यू) नुसार 2 वर्षे कारावास आणि 5 हजारांचा दंड, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार आजन्म कारावास व 5 हजारांचा दंड अशा प्रकारे दिंडोशी सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एच. सी. शेंडे यांनी शिक्षा सुनावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करु नका.