नोकरीवरून काढल्याने मालकाच्या घरात मारला ५४ लाखांचा डल्ला
दोन आरोपींना ठोकल्या बेड्या | जुहू पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कौतुकास्प कारवाई

मुंबई – राग येणे हा मनुष्याचा मूळ स्वभाव गुण आहे. या रागावर नियंत्रण ठेवल्यास प्रत्येक गोष्टीवर मात करता येते. मात्र अनेकदा रागाच्या भरात चुकीचे कृत्य मनुष्याच्या हातून घडते अन् पश्चाताप करण्यापलीकडे काहीच पर्याय उरत नाही. असाच प्रत्यय मुंबईतील जुहू परिसरात पाहावण्यास मिळाला. नोकरीवरून काढल्यामुळे संतापलेल्या नोकराने साथीदाराला मालकाच्या घरात चोरी करायला लावून ५४ लाख रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. या गुन्ह्याचा तात्काळ तपास करून जुहू पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने नोकरासह दोघांना बेड्या ठोकल्या. या कारवाईत ५४ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

असा आखला दिवसाढवळ्या लुटण्याचा प्लॅन
जुहू परिसरातील उच्चभ्रू वसाहतीत ७० वर्षीय व्यक्ती एकटाच राहतो. त्याच्या घरी सतीश सुरेश शिगवण, (वय ३४, वर्षे, धंदा -चालक, रा.ठी- रूम नंबर 19 97, प्रेम नगर पठाण चाळ समोर, २.५. रोड, विलेपार्ले पश्चिम, मुंबई) हा कामाला होता. मात्र तो नेहमी उशिरा कामावर येत. उद्धटपणे वागायचा. त्याच्या नेहमीच्या वागणुकीला वैतागुण वृद्धाने त्याला महिन्याभरापूर्वी कामावरून काढले. बेरोजगार झाल्याने त्याच्या मनात वृद्धाबद्दल राग होता. याचा वचपा काढण्यासाठी त्याने वृद्धाच्या घरात चोरी करण्याचा कट रचला. त्यासाठी साथीदार अंकुश मोंद्रे (वय ३१, धंदा -सिक्युरिटी गार्ड , रा.ठी 2021 जीवदानी अपाटर्मेंट जवळ, छेडा नगर हनुमान नगर रोड, नालासोपारा पश्चिम जिल्हा पालघर) याला कटात सहभागी केले. वृद्धाच्या घरी काम केल्याने सतीश याला घरातील सर्व माहिती होती. सदर माहिती त्याने अंकुशला पुरवली. त्यानुसार १६ जून २०२२ रोजी भर दुपारी अंकुश चोरी करण्यासाठी वृद्धाच्या घरात शिरला. त्याने कपाटातील सोन्याचे व हिरेजडित दागिने व रोख रक्कम असा एकूण ५४ लाख १४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल पळवला. दरम्यान, घरात चोरी झाल्या प्रकरणी वृद्धाच्या फिर्यादीवरून जुहू पोलिसांनी (गु.र.क्र. ७७४/२०२२ भादंवि कलम ४५४, ३८०, ३४) नुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
असा केला गुन्ह्याचा उलगडा
उच्चभ्रू परिसरात दिवसाढवळ्या चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे या गुन्ह्याचा तात्काळ उलगडा करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या. त्यानुसार जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित कुमार वर्तक, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय धोत्रे, हवालदार तोडणकर, पोलीस नाईक पाटील, पोलीस नाईक महांगडे, पोलीस नाईक मांडेकर, पोलीस नाईक अंचनाळे, पोलीस अंमलदार टोकरे, पोलीस अंमलदार भोसले, पोलीस अंमलदार कनमुसे यांनी आरोपींचा शोध सुरू केला. ज्या ठिकाणी वृद्ध राहत होता नेमके तेथे सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता. त्यामुळे आरोपीचा शोध घेणे पोलिसांपुढे मोठे आवाहन होते. तपासादरम्यान पोलिसांनी वृद्धाच्या घरापासून काही अंतरावर असलेले सीसीटीव्ही कॅमेºयांचे फुटेज तपासले. ऐन गर्दीच्या ठिकाणांमधील फुटेजमध्ये एका इसमाच्या संशायस्पद हालचालींवर पोलिसांना संशय आला. त्यानुसार पोलिसांनी तो इसम जसजास पुढे जात होता तसे जुहू परिसरापासून पुढे असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवाता केली. तब्बल १०० हून अधिक कॅमेºयांचे फुटेज तपासण्यानंतर शेवटी तो संशयित इसम सतीशला नालासोपारा परिसरात भेटल्याचे फुटेजमध्ये निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल करून सर्व हकीगत पोलिसांना सांगितली. त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी अंकुशलाही तुरुंगात धाडले.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
आपण ज्या परिसरात राहतो तेथे सीसीटीव्ही कॅमेरे अथवा सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे आहे. या गुन्ह्याचा विचार करता वृद्धाच्या घराच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. तसेच घरापासून काही अंतरापर्यंतही कॅमेरे नव्हते. त्यामुळे आपल्या सुरक्षेच्या अनुषंगाने सीसीटीव्ही कॅमेरे लावणे गरजेचे आहे. शेवटी आपली सुरक्षा आपल्याच हाती असते, त्यामुळे शक्य असल्यास राहत्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा लावावते किंवा सुरक्षारक्षक नेमावेत, असे आवाहन या गुन्ह्याच्या निमित्ताने जुहू पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
ही बातमीही वाचा…